भोसरीतील लांडेवाडी झोपडपट्टीची स्थिती आनंदनगरसारखी होण्याची भिती; राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष मंथन लोणकरांची घरोघरी कोरोना चाचणीची मागणी

भोसरी, दि. ६ (प्रतिनिधी) – भोसरी येथील लांडेवाडी झोपडपट्टीमध्ये एकाच दिवशी १७ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. लांडेवाडी झोपडपट्टीची चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीसारखी अवस्था होऊ नये म्हणून या झोपडपट्टीतील घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची आणि लहान मुलांची कोरोना चाचणी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मंथन लोणकर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात मंथन लोणकर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “भोसरीतील लांडेवाडी झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अत्यंत दाटीवाटीत वसलेल्या या झोपडपट्टीत एकाच दिवशी १७ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील गोरगरीब नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. येथे राहणारा प्रत्येक नागरिक हातावर पोट असलेला आहे. त्यामुळे या झोपडपट्टीत चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास येथील नागरिकांचे प्रचंड हाल होणार आहेत.

कोरोना रुग्ण सापडले म्हणून झोपडपट्टी सील केल्यानंतर प्रशासनाकडून येथील गोरगरीब नागरिकांना सर्व प्रकारची मदत मिळेलच याची शाश्वती राहिलेली नाही. आनंदनगर झोपडपट्टीवरून शहरातील नागरिकांनी त्याचा चांगलाच अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे लांडेवाडी झोपडपट्टीत आनंदनगर झोपडपट्टीसारखी स्थिती निर्माण होऊन हाताबाहेर परिस्थिती जाण्याआधी येथील प्रत्येक घरात जाऊन नागरिक व लहान मुलांची तातडीने कोरोना चाचणी करण्यात यावी.

आनंदनगर झोपडपट्टीत जसा नागरिकांचा उद्रेक झाला, त्याप्रमाणे लांडेवाडी झोपडपट्टीतील नागरिकांचाही उद्रेक होऊ नये म्हणून प्रशासनाने सर्व ती खबरदारी घ्यावी. झोपडपट्टीतील सर्व गोरगरीब नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यात यावी, अशी मागणी लोणकर यांनी केली आहे.”

Share this to: