भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर पिंपरी-चिंचवडमधील सात जणांची निवड; उमा खापरे यांना महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी संधी

पिंपरी, दि. ३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. ३) पक्षाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या सात जणांना संधी मिळाली आहे.

माजी नगरसेविका उमा खापरे यांना पक्षाने मोठी संधी दिली आहे. खापरे यांची महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडला भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मोठे स्थान मिळाले आहे. त्याचप्रमाणे अण्णभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांची पक्ष कार्यकारिणीत सचिवपदावर संधी देण्यात आली आहे.

याशिवाय माजी खासदार अमर साबळे यांची प्रदेश कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांची प्रदेश विधी सेलच्या सहसंयोजकपदी निवड करण्यात आली आहे. तसेच प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी नगरसेवक राजेश पिल्ले यांची प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे. या सर्वांचे भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह शहरातील पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Share this to: