लॉकडाऊनमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेला मास्कचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांचा कोरोना योद्धा पुरस्काराने गौरव करा – धुराजी शिंदे

पिंपरी, दि. ३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – कोरोना संकटात कडक लॉकडाऊन असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेला १५ लाख मास्क पुरविणाऱ्या ठेकेदारांचा महापालिकेमार्फत कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांनी महापौर माई ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात धुराजी शिंदे यांनी महापौर ढोरे आणि पक्षनेते ढाके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पुणे शहरात आजच्या घडीला ५ हजारापेक्षा जास्त कोरोना रूग्ण आहेत. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेला मास्क पुरविणाऱ्या ठेकेदारांमुळे आपल्या शहराचा आकडा ३ हजारापर्यंत मर्यादीत आहे. ज्या काळात कापड मिळणे मुश्किल झाले होते. ट्रान्सपोर्ट बंद होते, त्यावेळी अडचणीवर मात करून या ठेकेदारांनी महापालिकेला फक्त १० रूपयात मास्क दिले. हे मास्क महापालिकेने झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये मोफत वाटप केले. त्यामुळे कोरोना शहरात कंट्रोलमध्ये राहिला. आजही मेडिकलमध्ये हाच मास्क २५ ते ३० रूपयांना मिळत आहे.

त्यामुळे मास्क खरेदीत भ्रष्टाचार झाला असे ओरडणारे त्या काळात मात्र घरात लपून बसले होते. त्यामुळे त्यांना ओरडण्याचा नैतिक अधिकार नाही. आणीबाणीच्या काळात संकट समयी महापालिकेला मास्कचा पुरवठा करणाऱ्या सर्व ठेकेदारांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात यावा. मास्क खरेदीची चौकशी लावणे चुकीचे आहे. यापुढे संकटाच्या काळात कोणीही ठेकेदार पुढे येणार नाही. चौकशीचा फार्स बंद करून १५ लाख मास्क देणाऱ्या ठेकेदारांचा कोरोना योध्दा पुरस्कार देवून महापालिकेमार्फत गौरव करण्यात यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.”

Share this to: