पुणे महापालिकेकडून टाळेबंदीसंदर्भातील सुधारित आदेश आज

पुणे, दि.१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – राज्य सरकारने टाळेबंदीच्या सहावा टप्पा ३१ जुलैपर्यंत वाढविला आहे. ज्या शहरात जास्त रुग्ण आहेत, त्या शहरांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्याचे अधिकार राज्य शासनाने महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन आज बुधवारी सुधारित आदेश काढले जाणार आहेत.

पुणे महापालिकेकडून टाळेबंदीसंदर्भातील सुधारित आदेश आज बुधवारी जाहीर केले जाणार आहेत. पोलिसांबरोबर बैठक घेऊन हे आदेश काढले जाणार आहेत. टाळेबंदीमधील निर्बंध कठोर होण्याची शक्यता कमीच असून सवलतीही कायम राहणार आहेत. पुण्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला असून त्या दृष्टीने केवळ प्रतिबंधित क्षेत्राची फेर रचना करण्यात येणार आहे.

शहरातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे टाळेबंदीचे नियम कठोर केले जाणार नाहीत. प्रतिबंधित क्षेत्राची फेर रचना करण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी दिलेल्या सर्व सवलतीही कायम ठेवल्या जातील, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून तर रुग्णसंख्येने नियमितपणे पाचशेची संख्या ओलांडली आहे.मात्र शहरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा महापालिके कडून करण्यात आला आहे. करोनाबाधित रुग्णांची तातडीने तपासणी करण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट हे उपकरणही महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे करोना संसर्गावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असा दावाही करण्यात आला आहे.

Share this to: