शरद पवार आणि गोपीचंद पडळकर हे त्यांचे ते बघून घेतील – खासदार उदयनराजे

सातारा, दि. १ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांसंबंधी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांचे शरद पवारांशी फार चांगले संबंध होते. त्यामुळे गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर ते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना यावर भाष्य केलं असून माझं मत मी परखंडपणे मांडत असतो सांगत पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील असं म्हटलं आहे.

उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी सातारा जिल्हा बँकेत जाऊन बँकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आलं. “कोणी कोणाबद्दल काय बोलले ते मला विचारून बोलले नाहीत. माझं मत मी परखंडपणे मांडत असतो. शरद पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील,” असं उदयनराजे यांनी यावेळी म्हटलं.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं.

Share this to: