पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडीने विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प इमारतींच्या प्रवेशद्वारावर बसविले स्वयंचलित सॅनिटायझर मशीन

पिंपरी, दि. ३० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि कमलेश वाळके यांच्या प्रयत्नातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या पिंपरी-विठ्ठलनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर स्वयंचलित सॅनिटायझर मशीन बसविण्यात आले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

विठ्ठलनगर पुर्नवसन प्रकल्पाच्या परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढूला आहे. या पुनर्वसन प्रकल्पांमध्ये गोरगरीब नागरिक वास्तव्याला आहेत. प्रत्येकाला सॅनिटायझर खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कमलेश वाळके व संतोष जोगदंड यांनी परिसरात सॅनिटायझरची फवारणी केली. त्यामुळे कोरोना आटोक्यात येईलच याची शाश्वती नाही. त्यामुळे नागरिकांसाठी कमलेश वाळके यांनी “माझे विठ्ठलनगर, माझे कुटुंब, माझी काळजी” या संकल्पनेतून विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डिंग क्रमांक १, २, ३, ४, ६ आणि १३ या सहा इमारतीच्या प्रवेशद्वारावर स्वयंचलित सॅनिटायझर मशीन बसवले आहेत. येत्या काही दिवसांत पुनर्वसन प्रकल्पाच्या उर्वरित इमारतींमध्येही स्वयंचलित सॅनिटायझर मशीन लावण्यात येणार असल्याचे कमलेश वाळके यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडीचे माजी अध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या हस्ते या स्वयंचलित सॅनिटायझर मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कमलेश वाळके, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संतोष जोगदंड, अमोल माने, अरुण उबाळे, विलास शिखरे, फिरोज शेख, आकाश कांबळे, शेखर सरवदे, आनंद खरात  आदी उपस्थित होते.

Share this to: