पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षकाला कोरोनाची बाधा; श्रावण हर्डीकरांनी स्वतःला केले होम क्वारंटाईन

पिंपरी, दि. ३० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आयुक्त हर्डीकर यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. त्यांच्या स्वॅबचे (घशातील द्रव) नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

मोरवाडी येथे महापालिकेचा आविष्कार बंगला आहे. हा बंगला महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासाठी बांधण्यात आलेला आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर या बंगल्यात वास्तव्याला आहेत. या बंगल्यावर सुरक्षेचे काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या वडिलांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे या सुरक्षारक्षकाच्या कुटुंबातील सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

बंगल्यावरील सुरक्षारक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याने खबरदारी म्हणून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. त्याचप्रमाणे आयुक्त हर्डीकर हे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी घेतलेल्या अनेक बैठकांमध्ये सहभागी होते. आयुक्त हर्डीकर यांचा आमदार लांडगे यांच्यासोबत थेट संपर्क आला होता. त्यामुळे त्यांच्या स्वॅबचे (घशातील द्रव) नमुने आज (मंगळवार) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Share this to: