कोरोनासंबंधीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा,सामान्य लोकांना त्रास देऊ नका – आमदार शिवेंद्रसिंहाराजे भोसले

सातारा, दि.३० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – गृहमंत्री अनिल देशमुख हे जिल्हा दौऱ्यावर होते. कोरोना परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या आढावा बैठकीत आमदार शिवेंद्रसिंहाराजे भोसले यांनी कास पर्यटकांवर होणाऱ्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला.

आमदार शिवेंद्रसिंहाराजे भोसले म्हणाले, कास पठार हे जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेले पर्यटनस्थळ आहे. कास तलाव आणि कास पठार निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि कुटुंबीयांसमवेत विरंगुळा म्हणून शनिवार, रविवार, सुटीच्या दिवशी असंख्य सातारकर कासला फिरायला येतात. गेल्या काही दिवसांपासून पोलिस दलाकडून कासला जाणाऱ्या पर्यटकांवर सरसकट कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. या पर्यटकांत लहान मुले, वयोवृद्ध आणि महिला यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. पर्यटकांना काठीने मारण्याचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला. हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. सामान्य पर्यटकांवर कारवाई करणे अयोग्य आहे.पोलिसांनी सरसकट कारवाई न करता, हुल्लडबाज टोळक्‍यांवर, मद्य प्राशन करून धिंगाणा घालणाऱ्यांवर आणि बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांवर, तसेच कोरोनासंबंधीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, सामान्य लोकांना त्रास देऊ नये, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.

पुढे बोलताना म्हणाले, शाहूपुरी पोलिस ठाण्याची इमारत भाडेतत्त्वावर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या पोलिस ठाण्यासाठी तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच त्या जागेत इमारत उभारावी. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी नवीन वसाहत, इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम पूर्ण झाले नसून कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे. त्यामुळे या इमारती लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, असे शिवेंद्रसिंहराजेंनी निदर्शनास आणून दिले.

यावर मंत्री देशमुख यांनी याबाबत पोलिस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली.

यावेळी पालकमंत्री बाळसाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांच्यासह सर्व आमदार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते.

Share this to: