आनंदाची बातमी; कोरोनावर संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस तयार; जुलैपासून मानवी चाचणीला होणार सुरूवात

हैदराबाद, दि. ३० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये भारतदेखील आघाडीवर आहे. भारत बायोटेकने करोनावरील लस COVAXIN तयार केल्याची घोषणा केली आहे. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली आहे.

जुलै महिन्यापासून या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाणार असल्याची माहिती भारत बायोटेककडून देण्यात आली. “एसएआरएस-सीओव्ही -२ स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्हीमध्ये वेगळे करण्यात आले आणि नंतर भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्ये ही लस विकसित करण्यात आली, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.

भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने फेज १ आणि फेज २ मानवी वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या अगोदर कंपनीने प्रीक्लिनिकल अभ्यासामधून मिळविलेले निकाल सादर केले होते. मानवी वैद्यकीय चाचण्या पुढील महिन्यात देशभरात सुरू होणार आहेत.

आम्हाला अभिमान

कोविड -१९ वरील देशात विकसित केलेली ही देशातील पहिली लस असून आम्हाला त्याचा अभिमान आहे. या लसीच्या विकासात आयसीएमआर आणि एनआयव्हीचा सहभाग हा महत्त्वपूर्ण होता. सीडीएससीओच्या सक्रिय सहकार्याने आणि मार्गदर्शनाने याला मंजुरी देण्यात आली. आमच्या संशोधन टीमने आणि उत्पादन टीमने आमच्या स्वतःच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यासाठी अथक परिश्रम घेतले, असे मत भारत बायोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एला यांनी व्यक्त केले. सर्व प्रोटोकॉल्स पूर्ण करून कंपनीने वैद्यकीय चाचणी पूर्वीचा अभ्यास पूर्ण करण्याच्या उद्देशाने या संशोधनाला गती देण्यात आली. तसेच या अभ्यासाचे परिणाम प्रभावी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Share this to: