इंधन दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे आकुर्डी तहसील कार्यालयासमोर आंदोलन

पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – इंधन दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने आकुर्डी येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी (दि. २९) आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सेवा दलाचे राष्ट्रीय पदाधिकारी संग्राम तावडे, ज्येष्ठ नेत्या शामला सोनवणे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, विष्णुपंत नेवाळे, हिरामण खवळे, किशोर कळसकर, राजेद्रसिंह वालिया, मयूर जयस्वाल, लक्ष्मण रुपनर, शहाबुद्दीन शेख, चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे, सुनिल राऊत, तुषार पाटील, मुन्सफ खान, वसिम शेख, कुंदन कसबे आदी सहभागी झाले होते.

डॉ. रत्नाकर महाजन म्हणाले, “कोरोना प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे  उद्योग, व्यवसाय ठप्प झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ऑईलचे भाव कमी होत असताना मोदी सरकारने मात्र, मागील २२ दिवसांपासून रोज पेट्रोल, डिझेलचे भाव वाढविले आहेत. त्यामुळे पेट्रोल आठ ते दहा रुपये व डिझेल दहा ते बारा रुपये प्रती लिटरने दर वाढले आहेत. युपीए सरकारच्या काळात क्रूड ऑईलचे भाव १०५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत गेले असतानाही पेट्रोलचे भाव ६५ रुपये प्रती लिटरपेक्षा जास्त जाऊ देले नाहीत. मात्र, मोदी सरकारने डिझेलचे भाव पेट्रोलपेक्षा जास्त केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपुढे प्रचंड भाववाढीचे संकट उभे राहिले आहे. पेट्रोल, डिझेलची ही भाववाढ देशविरोधी, लोकविरोधी व लोकशाहीविरोधी आहे. याचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे. पेट्रोल, डिझेलची ही भाववाढ मागे घ्यावी, अशी मागणी महाजन यांनी केली.”

Share this to: