भोसरीचे आमदार आणि भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांना कोरोनाची लागण; चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू

पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा तापसणी अहवाल आज (सोमवार) पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आमदार लांडगे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या स्वॅबची (घशातील द्राव) तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आमदार लांडगे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता ते ज्या ज्या नागरिकांच्या संपर्कात आले त्यातील हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील नागरिकांच्या स्वॅबची तपासणी केली जाणार आहे.

आमदार लांडगे यांनी महापालिकेत आयुक्त, भाजपचे सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी अनेकदा बैठक घेतली आहे. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वायसीएम रुग्णालयाला नुकत्याच दिलेल्या भेटीतही आमदार लांडगे सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे या पाहणी दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लांडगे यांच्या भोसरीतील घरी जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला होता. त्यामुळे आता प्रशासन कोणाकोणाच्या स्वॅबची तपासणी करते आणि कोणाकोणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो हे पाहावे लागणार आहे.

Share this to: