शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिस वाहनाला लोणावळ्यात अपघात; पवार सुखरूप

लोणावळा, दि. २९ (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाला लोणावळा येथे अपघात झाला. या अपघातात पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. तर शरद पवार सुखरुप असून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

शरद पवार हे आज (सोमवार) द्रुतगती मार्गावरुन पुण्याहून मुंबईला जात होते. त्यावेळी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. लोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी घसरली. त्यामुळे ती रस्त्यावर उलटी झाली.

सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. गाडीतील पोलीस कर्मचारी मात्र किरकोळ जखमी झाला आहे. अपघात झाला त्यावेळी शरद पवार यांची गाडी पुढे होती. त्यामुळे त्यांच्या गाडीला कोणताही धक्का न लागल्याने ते सुरक्षित आहेत. स्थानिक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करुन पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना केला.

Share this to: