ठरले! तुकोबा आणि माऊलींच्या पादुकांचे लालपरीने म्हणजे एसटी बसने पंढरपूरकडे प्रस्थान होणार

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – देहू येथून जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांची आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला एसटी बसने नेण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, यासाठी प्रशासनाने काही अटी आणि नियम घालून दिले आहेत. एसटी बसमध्ये २० जणांना बसण्याची परवानगी असून फिजिकल डिस्टसिंग पाळले जाणार आहे. दोन्ही संतांच्या पादुका या पारंपरिक रस्त्याने ३० जून रोजी दशमीला मार्गस्थ होणार आहेत. विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी यासंदर्भात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत.

करोना विषाणूच्या संकटामुळे या वर्षीचा पालखी सोहळा अगदी सध्या पद्धतीने होत आहे. दरवर्षी पालखी सोहळ्यादरम्यान तुकोबा-माऊलींच्या गजराने आळंदी आणि देहू नगरी दुमदुमून जायची. मात्र, यावर्षी अगदी मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत १२ आणि १३ जूनला पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. मात्र, त्या मूळ मंदिरांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, दोन्ही संतांच्या पादुका या पंढरपूरकडे एसटीने की हेलिकॉप्टरने नेणार याबाबत निर्णय होत नव्हता.

पुणे जिल्ह्यातून संतांच्या पादुकांना अटी आणि कार्यपद्धती अवलंबून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी तर संत तुकाराम महाराज संस्थान, देहु तसेच संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड आणि चांगावटेश्वर देवस्थान, सासवड यांना पंढरपूर येथे पादुका घेऊन जाण्यास परवानगी मिळालेली आहे.

पालन करावयाचे नियम खालील प्रमाणे

पादुकांसोबत बसमध्ये २० व्यक्तींना जाण्याची परवानगी दिलेली असून ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना जाता येणार नाही. पादुकांसोबत जाणाऱ्या व्यक्तींची कोविड टेस्टही करण्यात येणार आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घेण्याबाबतचे आदेशही विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. संतांच्या पादुका असलेले वाहन प्रवासात कोठेही दर्शनासाठी थांबवण्यात येणार नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

Share this to: