श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे

मुंबई, दि.२७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सारे येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करूयात.श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. मूर्ती ४ फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात की, ‘कोरोना’मुळे प्रत्येक क्षेत्रात संकट आले आहे. त्या संकटापासून धर्म, परंपरा, संस्कृतीही सुटलेली नाही. गर्दी टाळण्यासाठी देशभरातील सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत, हे क्लेशदायक असले तरी मनुष्यहानी टाळण्यासाठी याशिवाय दुसरा उपाय आज नाही.

आता आपला सणांचा राजा गणेशोत्सव येत आहे. गणेशोत्सवाची एक उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राने जपली आहे. श्री गजानन घरोघर येतात. पण लोकमान्य टिळकांनी त्यास सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देऊन सामाजिक, राजकीय चळवळ निर्माण केली. मोठी जनजागृती त्यातून आजही होत असते.मुंबई-पुण्यातील भव्य गणेशमूर्ती, देखावे जगाचे आकर्षण ठरते. ते पाहण्यासाठी ११ दिवस प्रचंड गर्दी होत असते. निदान या वर्षी तरी आपल्याला हे सर्व टाळावे लागेल. मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांशी माझी चर्चा झाली. शिस्तीचे व सामाजिक भान ठेवून उत्सव करावा यावर एकमत झाले.

Share this to: