अभिमानास्पद; रहाटणीतील छायाचित्रकार राजेश पवार यांचे ‘ग्रेटर फ्लेमिंगो’ हे छायाचित्र आंतरराष्ट्रीय मॅगेझिनच्या कव्हर पेजवर प्रसिद्ध

चिंचवड, दि. १८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – रहाटणीतील छायाचित्रकार राजेश पवार यांचे ‘ग्रेटर फ्लेमिंगो’ हे छायाचित्र आंतरराष्ट्रीय मॅगेझिनच्या कव्हर पेजवर प्रसिद्ध झाले आहे. हा बहुमान मिळालेले राजेश पवार हे पिंपरी-चिंचवडमधील पहिले छायाचित्रकार आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

फोटोग्राफी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होणारे एक्स्पोजर हे मॅगझिन असून उत्कृष्ट छायाचित्रांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व छायाचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते. रहाटणी येथील राजेश पवार यांनी काढलेले ग्रेटर फ्लेमिंगो हे छायाचित्र पुण्याहून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या भिगवण जवळील उजनी डॅम या जलाशयातील आहे. याठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान हजारोंच्या संख्येने ग्रेटर फ्लेमिंगो वास्तव्यास असतात. या पक्षांसोबत इतरही अनेक प्रकारचे पक्षी येथे दिसून येतात.

राजेश पवार यांनी त्याठिकाणी जाऊन ग्रेटर फ्लेमिंगोचे फोटो काढले. राजेश पवार यांना गेल्या तीन वर्षांत पुणे फोटोग्राफर असोसिएशनचे (पीपीव्हिए) सहा पुरस्कार मिळाले आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व स्तरातून त्यांच्या कामाची दखल घेतली जात आहे. त्यांना व्यावसायिक व हौशी फोटोग्राफीतील ३० वर्षांचा अनुभव असून तंत्रज्ञानातील बदलांमुळे या क्षेत्रात रोज नवीन गोष्टी शिकाव्या लागत असल्याची भावना त्यांनी बोलुन दाखवली. पक्षांच्या छायाचित्रणासाठी भरपूर भटकंती, डिजिटल कॅमेऱ्याचे चांगले ज्ञान, पेशन्स आणि भरपूर वेळ या सर्व गोष्टी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Share this to: