पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांना नालेसफाई पाहणी दौऱ्या दरम्यान सांगवीमध्ये दिसला मटका अड्डा; लाखोंचा हफ्ता घेऊन पोलिस करताहेत दुर्लक्ष

चिंचवड, दि. १८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – महापौर माई ढोरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या नालेसफाई पाहणी दौऱ्यात एक वेगळेच धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कोरोना संकट काळातही शहरात मटक्याचे अड्डे खुलेआम सुरू असल्याचा प्रत्यय सांगवी भागातील पाहणी दौऱ्यात आला. सामान्यांनी कोरोना योद्धा म्हणून वाहवा केलेल्या पोलिसांच्या आशिर्वादानेच शहरात मटक्याचे अड्डे खुलेआमपणे सुरू असल्याचे वास्तव आहे. महिन्याला लाखोंचा हफ्ता घेऊन पोलिस या मटक्यांच्या अड्ड्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणारे हफ्ते घेऊन अवैध धंद्यांना बळ देत असल्याने सामान्यांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, गुरूवारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेविका शारदा सोनवणे तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगवी भागातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्याचप्रमाणे नदीलगतच्या भागात मान्सूनपुर्व पूरनियंत्रण कामाची देखील पाहणी केली. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या. म्हणून सर्वांनी प्रत्यक्ष जाऊन तेथे पाहणी केली. त्यावेळी तेथे असणाऱ्या काही जणांनी मटक्याच्या चिठ्ठ्या, रोख रक्कम व तत्सम साहित्य त्याच ठिकाणी टाकून पळ काढला. तसेच त्याठिकाणी विविध मटका बाजाराचे बोर्ड लावलेले व त्यावर ओपन क्लोज नंबर असलेले आढळून आले.

केवळ सांगवी भागातच नाही तर पिंपरी-चिंचवडच्या प्रत्येक भागात मटका, जुगार, सोरट यांसारखे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. कोरोनाच्या संकटात सुद्धा हे अवैध धंदे सुरू आहेत. त्याकडे पोलीस प्रशासनाकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गरीब नागरिकांना शोषित केले जात आहे. पोलिसांनी या अवैध धंद्यांना आळा घालणे गरजेचे आहे. परंतु, महिन्याला मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या हफ्त्यामुळे पोलिसांनी शहरातील अवैध धंद्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. महापालिका आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील अशा प्रकारचे मटक्याचे धंदे अनेक ठिकाणी सुरु असण्याची शक्यता आहे. मटक्यामुळे शहरातील अनेक गोरगरीब नागरिकांचे संसार उध्वस्त झाले असून  मटक्यासाठी  अनेक  कुटुंबात कौटुंबिक कलह वाढत आहेत. हे असेच सुरु राहिले तर अनेक गोरगरीब कुटुंबे व शहरातील युवक यांमुळे  बरबाद होण्याची भिती आहे. पोलीस यंत्रणेने या अवैध मटका धंद्याकडे वेळीच लक्ष घालून ते बंद करावेत आणि ते चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई यांच्याकडे केली आहे.

Share this to: