आमदार निधीतून सांगवीतील जिल्हा रुग्णालयाला १ कोटी १० लाखांची यंत्रसामुग्री; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी, दि. १८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – सांगवी येथील औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून सुमारे ४८ लाखांची यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यात आले आहे. ही यंत्रसामुग्री व साहित्य रुग्णालयाला उपलब्ध झाले आहे. त्याचे आमदार जगताप यांच्या हस्ते गुरूवारी (दि. १८) उद्घाटन करण्यात आले. या यंत्रसामुग्रीमुळे रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर चांगले उपचार करणे शक्य होणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांनी औंध ऊरो रुग्णालयात कमी खर्चात होणाऱ्या उपचारसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.

सांगवी येथे सरकारचे औंध ऊरो जिल्हा रुग्णालय आहे. हे रुग्णालय चिंचवड विधानसभा मतदारसंघांतर्गत येते. या रुग्णालयाचा पिंपरी-चिंचवडसोबतच पुणे शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना फायदा होतो. याठिकाणी गोरगरीब रुग्णांवर कमी दराने चांगले उपचार होतात. त्यामुळे याठिकाणी उपचारासाठी दर्जेदार आणि चांगली यंत्रसामुग्री व साहित्य असणे गरजेचे आहे. त्याचा विचार करून आमदार जगताप यांनी औंध ऊरो जिल्हा रुग्णालयासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत  २ डायलिसीस मशीन, डायलिसीस विभागासाठी एक हजार लिटर क्षमेतेचे १ आरओ प्लॅन्ट, ५ फंक्शन बेड आणि २ व्हेंटिलेटर मशीन खरेदी केले आहेत.  

या सर्व यंत्रसामुग्री आणि साहित्यासाठी एकूण ४६ लाख ७६ हजार ९०० रुपये खर्च आले आहे. ही यंत्रसामुग्री आणि साहित्य औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाले आहे. त्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते गुरूवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुणे आरोग्य विभागाचे उपसंचालक नितीन बिलोलीकर, सिव्हिल सर्जन अशोक नांदापूरकर, रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन शहराच्या हद्दीवरच सांगवी येथे सरकारचे जिल्हा रुग्णालय आहे. याठिकाणी रुग्णांवर कमी खर्चात चांगले उपचार केले जातात. हे रुग्णालय गोरगरीब रुग्णांसाठी वरदान आहे. रुग्णालय आणखी सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जेणेकरून या रुग्णालयांत दुर्धर आजारांवरही उपचार व्हावेत, हा हेतू आहे. आता या रुग्णालयांत डायलिसीस विभाग सक्षम करण्याच्या उद्देशाने यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील गोरगरीब रुग्णांवर उपचारांसाठी औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात उपलब्ध यंत्रसामुग्रीचा चांगला उपयोग करता येईल. रुग्णांनीही महागड्या रुग्णालयात जाऊन आपली आर्थिक लूट करून घेण्यापेक्षा औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले.”  

Share this to: