निगडी, सेक्टर क्रमांक २२ मधील नागरिकांना अर्सेनिक अल्बम-३० आणि मास्कचे वाटप करा; माजी नगरसेवक तानाजी खाडे यांची महापालिकेकडे मागणी

भोसरी, दि. १६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून, संकट गंभीर होताना दिसत आहे. निगडी सेक्टर क्रमांक २२ मध्ये सुद्धा कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या भागात महापालिकेच्या वतीने अर्सेनिक अल्बम-३० या औषधाचे तसेच मास्कचे मोफत वाटप करण्यात यावे. त्याचप्रमाणे याठिकाणी सॅनिटायझरची फवारणी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक तानाजी खाडे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात तानाजी खाडे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने कोरोना व्हायरस संक्रमणाच्या विरूध्द प्रतिबंधात्मक औषध म्हणून  ‘अर्सेनिक अल्बम-30’ हे होमिओपॅथीक औषध सुचविले आहे. आता पर्यंतच्या सर्व्हेनुसार या होमिओपॅथीक औषधाचे अतिशय चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे शासनाने त्याचा वापर करण्यास परवानगी दिलेली आहे.

निगडी, सेक्टर क्रमांक २२ मधील सर्व नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी व कोरोना संक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रभावी ठरलेल्या या होमिओपॅथी टॅब्लेटसचे येथील नागरिकांना वाटप करण्यात यावे. तसेच प्रत्येकाला मास्कचे मोफत वाटप व निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरची फवारणी करण्यात यावी, अशी मागणी तानाजी खाडे यांनी केली आहे.”

Share this to: