भोसरीतील प्रज्योत फुगे या तरुणाची कौतुकास्पद संवेदनशीलता; वाढदिवसाचा खर्च टाळून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

भोसरी, दि. १० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – आपला वाढदिवस जंगी आणि जिवलग मित्र-मैत्रिणी व परिवारातील लोकांमध्ये साजरा करण्यात यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग आपल्या वाढदिवसावर प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे खर्च करतात. मात्र वाढदिवस साजरा न करता जो खर्च येणार आहे तो चांगल्या कामासाठी उपयोगात आणणारे दुर्मिळच. या सर्व प्रकाराला फाटा देत सामाजिक भान आणि जबाबदारी ओळखून भोसरी येथील प्रज्योत अनिल फुगे या तरुणाने आपल्या वाढदिवसावर होणारा खर्च कोरोना विरोधात सुरू असलेल्या लढाईत पंतप्रधान सहाय्यता निधीला आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला आहे. एवढेच नाही तर आपल्या काही मित्रांनाही त्याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत द्यायला लावले.

भोसरीत राहणाऱ्या प्रज्योत फुगे या तरुणाचा बुधवारी (दि. १०) वाढदिवस होता. गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटाची त्याला पूर्ण जाणीव आणि भान सुद्धा आहे. त्यामुळे त्याने स्वतःचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करून क्षणिक आनंद घेण्यापेक्षा कोरोना विरोधात लढणाऱ्या सरकारला देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने केवळ महाराष्ट्र सरकारलाच नाही तर केंद्र सरकारलाही मदतीचा हात दिला आहे. प्रज्योतने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रत्येकी दहा हजार रुपये जमा केले. एवढेच नाही तर आपल्या काही मित्रांनाही त्याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आर्थिक मदत जमा करायला लावले.

यासंदर्भात प्रज्योत फुगे म्हणाला, “माझ्या वाढदिवसाचा हा खर्च देशाच्या आणि राज्याच्या संकटात कामाला यावा हे माझे भाग्य आहे. सामाजिक भान ठेवून काम करा ही वडिलांची शिकवण असल्याने कोरोनाच्या या लढाईत माझा आणि माझ्या मित्रांनी खारीचा वाटा उचलला असल्याचे खूप मोठे समाधान आहे.

Share this to: