पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या उलट्या बोंबा; मारहाण झालेले भाजप नगरसेवक विलास मडिगेरी यांना संरक्षण पुरविण्याची पोलिस आयुक्तांकडे केली मागणी

पिंपरी, दि. ३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे या दोघांनी स्थायी समितीचे माजी सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत केलेली मारहाण किरकोळ स्वरुपाची असल्याचे पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीने म्हटले आहे. उलट विलास मडिगेरी यांना भाजपकडूनच घातपात होण्याचा धोका असल्याचा जावईशोध राष्ट्रवादीने लावला आहे. तसेच मडिगेरी यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीने पोलिस आयुक्त यांच्याकडे केली आहे.    नगरसवेकांमध्ये महापालिकेत झालेल्या या फ्री-स्टाइल हाणामारीचा राष्ट्रवादीकडून साधा निषेध सुद्धा करण्यात आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला पिंपरी-चिंचवड महापालिकेत हाणामारीची संस्कृती रुजवायची आहे का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “स्थायी समितीच्या कार्यालयात माजी सभापती विलास मडिगेरी यांनी जाणीवपूर्वक हाणामारीचा प्रकार घडवून आणला असून, तो मोठ्या कटाचा भाग आहे. मडिगेरी यांनीच वाद उकरून काढला. राहुल कलाटे आणि मयूर कलाटे या दोघांबरोबर त्यांनी जाणीवपूर्वक भांडणे केली. दोघेही स्थायी समिती कार्यालयातून बाहेर जात असताना मडिगेरी यांनी त्यांना भांडणे करण्यास प्रवृत्त केले. कॉलर पकडून अरेरावीची भाषा करत भांडणास सुरूवात केली. त्यांच्यात छोटासा वादविवाद झाला.

मडिगेरी यांनी नाटकी आव आणत आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल झाले आहेत. किरकोळ वादावादी झाली असताना भाजपकडून त्याला जाणीवपूर्वक मोठे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात असल्याने जनतेत वेगळीच चर्चा रंगली आहे. राहुल कलाटे आणि मयूर कलाटे हे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तरूण लोकप्रतिनिधी आहेत. कटकारस्थान रचून या दोघांना राजकारणातून संपविण्याचा डाव आखण्यात आला आहे. मडिगेरी यांच्या माध्यमातून भाजपकडून अत्यंत घाणेरडे राजकारण खेळले जाण्याची भिती आम्हाला वाटत आहे.

मडिगेरी यांच्यावर आदित्य बिर्ला रुग्णालयात सुरू असलेले उपचार हा त्याच कटाचा एक भाग आहे. या रुग्णालय प्रशासनाशी भाजपच्या नेत्यांचे संबंध आहेत. या रुग्णालयावर भाजपच्या नेत्यांचा दबावही असू शकतो. आपणाला हवे ते रिपोर्ट बनवून घेऊ शकतात. तसेच मडिगेरी यांच्याबाबत रुग्णालयात काही अनपेक्षित घातपाताचा कट घडवून आणू शकतात. त्यामुळे मडिगेरी यांना पोलिस संरक्षण देऊन त्यांचे संरक्षण करण्याची गरज आहे.”

निवेदनावर शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share this to: