पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात झाडे पडल्याच्या २१५ तक्रारी; महापौर माई ढोरे यांनी जागेवर जाऊन केली पाहणी

पिंपरी, दि. ३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड शहराला निसर्ग चक्रीवादळाचा बुधवारी (दि. ३) मोठा फटका बसला. दिवसभर पडत असलेला जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शहराच्या विविध भागात झाडे पडल्याच्या २१५ तक्रारी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. याबाबत महापौर माई ढोरे यांना माहिती मिळताच झाडे पडलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी केली. तसेच महापालिकेचा उद्यान विभाग आणि आपत्ती विभागाला सूचना करून पडलेली झाडे काढण्यास लावले.

निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारी महाराष्ट्राच्या कोकण आणि मुंबई किनारपट्टीवर धडकले. या चक्रीवादळाचा पिंपरी-चिंचवडमध्येही परिणाम दिसून आला. गेल्या दोन दिवसांपासून शहरात पाऊस पडत आहे. बुधवारी त्यात वादळी वाऱ्याची भर पडली. पाऊस आणि वादळी वारा यामुळे पिंपरी-चिंचवडच्या विविध भागात झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्यांवर, काही ठिकाणी वाहनांवर, तर काही ठिकाणी इमारतींवरही मोठमोठी झाडे कोसळली आहेत.

बुधवारी दिवसभरात झाडे पडल्याच्या तब्बल २१५ तक्रारी पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापौर माई ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच महापौर माई ढोरे यांनी बुधवारी स्वतः शहराच्या वेगवेगळ्या भागात झाडे पडलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यांनी तातडीने उद्यान विभाग आणि आपत्ती विभागाला बोलावून घेत पडलेली झाडे बाजूला करण्यास सांगितले. शहराच्या ज्या ज्या भागात झाडे पडली आहेत, त्या सर्व ठिकाणी प्रशासनाला जाण्यास त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.

Share this to: