राहुल कलाटे आणि मयूर कलाटे यांच्याकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेची होणारी लूट थांबविल्यामुळेच आगपाखड सुरू आहे; सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांचा आरोप

पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना केलेल्या मारहाणीमुळे शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांचा गुंडगिरी आणि दादागिरीचा खरा चेहरा शहरातील जनतेसमोर आला आहे. संपूर्ण शहरात आणि राजकीय वर्तुळात “छी-तू” होऊ लागल्यामुळे आपली गुंडगिरी लपविण्यासाठी या दोघांनीही महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर खासगी वाटाघाटीने भू-संपादनाचा विषय मंजूर केला जात नसल्यामुळे हा प्रकार झाल्याचे सांगत आहेत. वास्तविक हा विषय सभेत तहकूब ठेवण्यात आला आहे. प्रस्ताव मागे घेण्यात आलेला नाही. महत्वाची बाब म्हणजे हा प्रस्ताव एकटे विलास मडिगेरी मंजूर करत नाहीत, तर सभागृहात सर्वसंमतीने प्रस्ताव मंजूर केले जातात. त्यामुळे विलास मडिगेरी यांना राहुल कलाटे आणि मयूर कलाटे या दोघांनी केलेली मारहाण निंदनीय आहे. हे दोन्ही बंधू पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात गुंडगिरी आणि दादागिरीची राजकीय संस्कृती रूजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे.

यासंदर्भात सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून महापालिकेत वेगळेच राजकारण केले जात आहे. नागरिकांच्या कामांऐवजी वैय्यक्तिक स्वार्थासाठी “आडवा, जिरवा आणि मारहाण करा”, असा प्रकार शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून सुरू आहे. त्यातूनच शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी स्थायी समितीचे माजी सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना सोमवारी महापालिकेत बेदम मारहाण केली. हा प्रकार निंदनीय आहे. त्यामुळे राहुल कलाटे आणि मयूर कलाटे यांची संपूर्ण शहरात आणि राजकीय वर्तुळात “छी-तू” सुरू आहे.

आपली ही दादागिरी आणि गुंडगिरी लपविण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर खाजगी वाटाघाटीने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला जात नसल्याचे कारण या दोघांनी पुढे केले आहे. जर या कारणासाठी विलास मडिगेरी यांना मारहाण केली असल्यास मडिगेरी हे एकटेच महापालिकेत निर्णय घेत नाहीत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वसंमतीने प्रस्ताव मंजूर केले जातात. विरोध असणाऱ्या नगरसेवकांचा विरोध नोंदवून घेतला जातो. त्यामुळे मडिगेरी यांनी प्रस्ताव मंजूर करून घेतला नाही, असे कलाटे बंधूंनी म्हणणे म्हणजे हास्यास्पद आहे. खासगी वाटाघाटीने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत तहकूब ठेवण्यात आला आहे. प्रस्ताव मागे घेण्यात आलेला नाही. हा प्रस्ताव पुन्हा सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी येणारच आहे. त्यामुळे कलाटे बंधू खोटे बोलत आहेत, हे यातून स्पष्ट होते.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे खाजगी वाटाघाटीने भूसंपादन करण्याच्या नियमाचा आधार घेऊन काही जणांनी महापालिकेला लुटण्याचा धंदा चालविला आहे. महापालिकेला शहरातील विविध आरक्षणे विकसित करावी लागतात. त्यासाठी खासगी जमिनी ताब्यात घ्याव्या लागतात. त्याचा मोबदला म्हणून मोठ्या प्रमाणात रक्कम अदा करावी लागते. हीच बाब हेरून काही जण आरक्षणातील जमिनी एजंटांमार्फत कवडीमोल दराने खरेदी करतात. या जमिनीचे छोटे-छोटे तुकडे करून त्या महापालिकेला देण्याच्या मोबदल्यात कोट्यवधी रुपये लाटले जात आहेत. त्यातून महापालिकेची तिजोरी रिकामी होऊ लागली आहे. त्यामुळे खाजगी जमिनी वाटाघाटीने घेताना रोख रक्कमेच्या मोबदल्याऐवजी महापालिकेने टीडीआर देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामागे शहरातील करदात्या नागरिकांच्या पैशांचा शहराच्या विकासासाठी विनियोग व्हावा हा हेतू आहे. परंतु, महापालिकेला लुटणारे काही जण वैय्यक्तिक लाभासाठी शहरा हिताच्या या प्रस्तावाला विरोध करत आहेत.

राहुल कलाटे आणि मयूर कलाटे यांनाही हा प्रस्ताव आवडलेला नाही. त्यांनी वाकड येथील एक मोठा रस्ता गेल्या १० ते १५ वर्षांपासून अडवून ठेवला आहे. अगदी न्यायालयापर्यंत हा विषय नेऊन रस्ता लवकर तयार होणार नाही, याची कलाटे बंधूंनी पुरेपूर काळजी घेतली आहे. हा रस्ता इतर ठिकाणी पूर्ण झाला आहे. परंतु, फक्त कलाटे यांनी अडवून ठेवलेल्या जागेत या रस्त्याचे अद्याप काम पूर्ण होऊ शकलेले नाही. वाकड भागातील नागरिकांना कलाटे यांनीच रस्त्यांपासून वंचित ठेवले आहे. अशा प्रकारे अडवणूक करायची आणि महापालिकेला लुटण्याचा धंदा करायचा हे योग्य नाही. हे समान्यांना समजत नाही, असे राहुल कलाटे यांना वाटते. परंतु, महापालिकेने त्यांच्या या धंद्याला कायमचा आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातूनच राहुल कलाटे हे आगपाखड करून एका ज्येष्ठ नगरसेवकाला मारहाण करत असतील, तर ते निंदनीय असल्याचे ढाके म्हणाले.”

Share this to: