लॉकडाऊनमुळे नोकरी गेलीय, पगार कापला गेलाय…तर आमच्याशी संपर्क साधा; मनसेचे आवाहन

मुंबई, दि. २ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – लॉकडाऊनच्या काळात नोकऱ्या गेलेल्या, पगार कपातीची झळ बसलेल्या आणि अडचणीत आलेल्या लहान-मोठ्या उद्योजकांनी मनसेशी संपर्क साधावा, असं आवाहन मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केलं आहे. संपर्कासाठी त्यांनी एक मोबाइल क्रमांकही दिला आहे.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. याचा फटका समाजातील अनेक वर्गांना विशेषत: तरुणांना बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांना पगारकपातीला सामोरं जावं लागलं आहे. तर, मुंबईसह राज्यातील अनेक उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. उद्योजकांकडं पगार द्यायला पैसे नाहीत. यापैकी कुठल्याही गोष्टीची ठोस दखल राज्य किंवा केंद्र सरकारकडून घेतली गेलेली नाही. राज्य सरकार केवळ फेसबुकवर गोडगोड बोलते. केंद्र सरकार २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर करते. मात्र, समाजातील विविध वर्गांना लॉकडाऊनचा नेमका कसा फटका बसला याचा कुठलाही सर्व्हे करण्यात आलेला नाही, असा मनसेचा आरोप आहे. सरकारचे हे काम आता महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना करणार आहे, असं देशपांडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळंच लॉकडाऊनचा फटका बसलेल्या सर्व संबंधितांनी संदीप बोरकर यांच्याशी ९९२०३ ३४४४१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

कोणी संपर्क साधावा?

>> लॉकडाऊनमुळं नोकरी गेली असेल त्यांनी…

>> लॉकडाऊनमुळं ज्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे त्यांनी…

>> ज्यांचे उद्योगधंदे बंद पडले आहेत अशा उद्योजकांनी…

>> स्थलांतरीत मजूर राज्याबाहेर गेल्यामुळं ज्या कंपन्यांना कर्मचारी मिळत नाहीत त्या कंपन्यांनी…

>> बँकांकडून ज्यांना कर्ज मिळत नाही त्यांनी…

माहिती घेऊन मनसे काय करणार?

लॉकडाऊनमुळं लोकांवर नेमकी काय परिस्थिती ओढवलीय याची अजिबात कल्पना सरकारला नाही, असा मनसेचा आरोप आहे. त्यामुळंच ही माहिती गोळा केली जाणार आहे. हा डेटा गोळा झाल्यावर सरकारपुढं ठेवता येईल आणि त्यावर योग्य तो उपचार करता येईल,’ असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

Share this to: