मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा झाले ३४२ कोटी; सरकारने कोरोनावर खर्च केले अवघे २३ कोटी

मुंबई, दि. १ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – कोरोना संक्रमितांच्या उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र सीएम रिलीफ फंड कोव्हिड-19 अकाउंटमध्ये आतापर्यंत 342 कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे. परंतू, यातील फक्त 23 कोटी 82 लाख 50 हजार रुपये खर्च झाला आहे. तर, 262 कोटींपेक्षा जास्त रक्कम अद्याप खात्यातच पडून आहे.

ही माहिती एका माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी रिलीफ फंड कोव्हिड-19 अकाउंटमध्ये जमा झालेली एकूण रक्कम आणि वापरलेल्या निधीचा तपशील मागविला. सीएम रिलीफ फंडकडून दिलेल्या माहितीनुसार, सर्वात जास्त रक्कम 55 कोटी 20 लाख रुपये प्रवासी मजुरांच्या प्रवासावर खर्च झाली आहे, तर 80 लाख रुपये औरंगाबाद रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना देण्यात आले.

रेल्वे अपघात आणि प्रवासी मजुरांवरील खर्च

सीएम रिलीफ फंडाचे सहायक लेखाधिकारी मिलिंद काबाडी यांनी सांगितल्यानुसार, 18 मे 2020 पर्यंत एकूण 342.01कोटी रुपये जमा झाले. या पैशातून 79 कोटी 82 लाख 37 हजार 070 रुपये खर्च करण्यात आले. खर्च केलेल्या रकमेतून कोव्हिड-19 वर फक्त 23 कोटी 82 लाख 50 हजारांचा खर्च झाला. यातील 20 कोटी रुपये मुंबईतील सेंट जार्ज रुग्णालयाला देण्यात आले. 3 कोटी 82 लाख 50 हजार रुपये मेडिकल शिक्षण आणि संशोधन विभागाला देण्यात आले.

प्रवासी मजुरांसाठी देण्यात आला 53.4 कोटी रुपयांचा किराया

प्रवासी मजुरांसाठी जी रक्कम देण्यात आली, ती राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. यातून रेल्वेचे वेळेवर पैसे देण्यात येतील. यात 36 जिल्ह्यातील प्रवासी मजुरांचा किराया 53 कोटी 45 लाख 47 हजार 070 रुपये सांगण्यात आला आहे. रत्नागिरीच्या मजुरांचा रेल्वे किराया 1.30 कोटी रुपये आणि सांगलीच्या मजुरांचा रेल्वे किराया 44.40 लाख रुपये देण्यात आला. औरंगाबादमध्ये रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 80 लाख रुपयांची मदत सीएम रिलीफ फंड कोव्हिड -19 अकाउंटमधून करण्यात आली.

आरोग्य सेवेवर फक्त 7 टक्के रक्कम खर्च

गलगली यांनी सांगितल्यानुसार, महाराष्ट्र सरकारने कोव्हिड-19 साठी जमा झालेल्या एकूण रकमेपैकी 7 टक्के रक्कम आरोग्य सेवांवर खर्च केली आहे. प्रवासी मजुरांच्या रेल्वे तिकीटांवर 16% रक्कम खर्च झाली. रेल्वे अपघातातील मृतांवर 0.23 % खर्च झाली. आजदेखील सीएम रिलीफ फंडमध्ये रु. 262.28 कोटी जमा आहेत.

Share this to: