पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करायचे आहे, विलास लांडे यांना विधान परिषदेवर आमदार करा; सामान्य कार्यकर्त्यांची शरद पवार यांच्याकडे मागणी

पिंपरी, दि. १ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास लांडे यांना पुन्हा आमदार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सामान्य कार्यकर्त्यांकडूनच ही मागणी लावून धरण्यात येत आहे. शहरातील राजकीय सद्यःस्थितीत लांडे यांचे राजकीय पुनर्वसन करणे अत्यंत गरजेचे असून, तसे झाले तर त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फायदा होईल. आगामी निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणायची असेल तर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांना विधान परिषदेवर आमदार करा, अशी मागणी बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात संतोष निसर्गंध आणि सतीश कदम यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे हे राजकीय वस्ताद आहेत. त्यांनी १० वर्षे आमदार म्हणून विकासाचेच राजकारण केले. पिपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला तोडीस तोड टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्ष संघटन मजबूत करणारा सर्व समाजघटकांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांना ताकद देणारा आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची क्षमता केवळ माजी आमदार विलास लांडे यांच्यातच आहे. त्यांच्या रूपाने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठा बदल होईल. राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसने कमबॅक केल्याचा राजकीय फायदा पिंपरी-चिंचवडला होईल. शहर राष्ट्रवादीत विलास लांडे यांचासारखा दुसरा दिग्गज नेता नाही आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे दुसरे नेतृत्व नाही हे वास्तव आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून लांडे यांचे राजकीय पुनर्वसन करणे गरजेचे नाही तर पक्षाची ती राजकीय गरज आहे.

राज्यातील सत्ताचक्र फिरले आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना केली आहे. राज्याच्या राजकारणात झालेली ही उलथापालथ पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरू शकते. त्याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यानुसार राज्यात बदललेल्या सत्ता समीकरणाचा पिंपरी चिंचवड शहराला राजकीय फायदा होईल.

विलास लांडे यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदारसंघात पराभव झाला असला तरी शहराच्या राजकारणातील ते दिग्गज नेते आहेत. शहर राष्ट्रवादीत लांडे यांचासारखा एकही दुसरा मुरब्बी नेता नाही. समाजातील सर्व घटकाला सोबत घेण्याची किंबहुना विरोधकांना देखील आपलेसे करण्याची त्यांच्यात राजकीय क्षमता आहे. भोसरीच्या राजकारणाचा विचार केल्यास राष्ट्रवादीला हा मतदारसंघ पुन्हा काबिज करायचा असेल, तर विलास लांडे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यातच लांडे हे स्वतःच्या ताकदीवर राजकारण करून पक्ष संघटनेला मजबुती देणारे नेते मानले जातात. त्यामुळे लांडे यांचे राजकीय पुनर्वसन झाल्यास त्याचा राष्ट्रवादीला राजकीय फायदा होणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये लांडे वगळता राष्ट्रवादीला सावरू शकेल व पक्षाला पुन्हा उर्जितावस्थेला आणू शकेल, असा कोणाताही नेता आढळून येणार नाही. लांडे यांच्यामध्ये असणारी राजकीय प्रगल्भता, जमेच्या बाजू आणि शहरातील राजकीय सद्यःस्थिती पाहता पक्षाकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन करून, त्यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी देण्यात यावी, अशी मागणी निसर्गंध व कदम यांनी केली आहे.”

Share this to: