पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्टी भागात कोरोना स्वॅब तपासणीसाठी महापालिकेने व्हॅन उपलब्ध करून द्यावी; आरपीआयचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांची मागणी

पिंपरी, दि. १ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्टी भागात कोरोना स्वॅब तपासणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने व्हॅन उपलब्ध करून द्यावी. तसेच कोरोना झालेल्या झोपडीधारकाच्या संपूर्ण कुटुंबाची कोरोना तपासणी करून जवळपासच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये विलगीकरण करण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात सुरेश निकाळजे यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरीचिंचवडमधील झोपडपट्टी भागात महापालिका कुठलेही लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. शहरातील बौद्धनगर, आनंदनगर, भाटनगर या झोपडपट्टी भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तेथील स्थानिक नागरिक कोरोना तपासणी आहे त्याच जागेवर व्हावी, अशी मागणी करत आहेत. त्यासाठी स्वॅब तपासणी व्हॅन उपलब्ध करून देणे महापालिकेला सहज शक्य आहे. परंतु, महापालिका प्रशासन झोपडपट्टीतील गोरगरिबांच्या मागणीकडे लक्ष देत नाही. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांच्या कुटुंबांची कोरोना तपासणी देखील करत नाही. वरून त्या कुटुंबाला असे सांगण्यात येते की तुम्हाला काही त्रास असल्यास रुग्णालयात यावे.

वास्तविक पाहता कोरोना संसर्गाचे लक्षण हे काही एक-दोन दिवसात दिसत नाहीत. काही नागरिकांमध्ये तर लक्षणे दिसत नसतानाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबांची तपासणी न करता त्यांना दाटीवाटीने राहत असलेल्या झोपडपट्टी भागातच राहू दिले जाते. त्यांना कुठेही क्वारंटाईन केले जात नाही. संबंधित कुटुंबही आपल्याला काही नाही झाले या अविर्भावात मोकळे फिरत असतात. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे झोपडपट्टी भागात कोरोना संसर्ग वाढत आहे. संसर्गाचा हा उद्रेक शहरात झाल्यास त्यास पूर्णपणे महापालिकेचे प्रशासनच जबाबदार राहील. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी भागात त्वरित स्वॅब तपासणी व्हॅन बौध्दनगर, आनंदनगर, भाटनगर, माता रमाबाईनगर, लिंकरोड पत्राशेड या त्याठिकाणी राहत असलेल्या हजारो नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबांची कोरोना तपासणी करून त्यांना जवळपास असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात यावे, अशी मागणी निकाळजे यांनी केली आहे.”

Share this to: