ताकदीचा अभिनेता इरफान खान यांचे निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली

मुंबई, दि. २९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र बुधवारी दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत खान कुटुंबियांचं सांत्वन केलं.

शूजीत यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, ‘इरफान माझ्या मित्रा.. तू लढलास आणि लढलास आणि लढलास.. मला तुझा नेहमीच अभिमान वाटेल. आपण पुन्हा भेटू. सुतापा आणि बाबिल तुम्हीही लढलात. सुतापा या लढाईत तुला जे शक्य होतं ते तू केलंस. ओम शांती. इरफान खानला सलाम.’

दोन दिवसांपूर्वी त्याची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. लॉकडाउनमुळे इरफान आईला शेवटचं पाहायलाही जाऊ शकला नाही. आईचं अंत्यदर्शनही त्याला व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावं लागलं होतं. आईला शेवटचं पाहता आलं नाही ही सल त्याच्या मनात होती.

गेल्या काही वर्षांपासून इरफान आजारी आहे. २०१७ मध्ये कर्करोगावर उपचार करण्यासाठी तो परदेशात गेला होता. याबद्दल त्याने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली होती. गेल्या वर्षी २०१९ मध्ये तो भारतात परतलाही. भारतात आल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं.

२०१८ पासून सुरू होते उपचार

इरफान खान यांना न्यूरोएण्डोक्राइन ट्यूमरचा आजार होता. लंडनमध्ये त्यांच्यावर काही काळ उपचारही सुरू होते. तब्येतीत सुधारणा आल्यानंतर ते भारतात परतले होते. मात्र पुन्हा दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली अन् कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

कोकिलाबेनमध्ये नियमित सुरू होतं चेकअप

लंडनहून भारतात परतल्यानंतर इरफान यांचं नियमित चेकअप व्हायचं. गेल्या काही महिन्यांपासून ते कोकिलाबेन इस्पितळात उपचार घेत होते. ‘अंग्रेजी मीडियम’ सिनेमाच्या चित्रीकरणावेळीही अनेकदा त्यांची तब्येत बिघडायची. अशावेळी अनेकदा सिनेमाचं चित्रीकरण थांबवलं जायचं आणि जेव्हा इरफान यांना चांगलं वाटायचं तेव्हा चित्रीकरण पुन्हा सुरू केलं जायचं.

Share this to: