पिंपरी-चिंचवडमधील सील केलेल्या भागात जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याच्या उपाययोजना करा – सचिन चिखले

पिंपरी, दि. २३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या पिंपरी-चिंचवडमधील काही भाग महापालिका प्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत. या भागात जीवनावश्‍यक वस्तुंची दुकाने ठराविक वेळेत उघडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, सील केलेल्या भागात मोठा पोलीस बंदोबस्त असून, नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळविताना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सील केलेल्या भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी महापालिका प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष व गटनेता सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात सचिन चिखले यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेता, हा प्रसार आता कम्युनिटी ट्रान्सफरच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. निगडी यमुनानगरमधील सेक्टर २२ सह पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे, पुनावळे, भोसरी, पिंपळे सौदागर, मोशी, थेरगाव, खराळवाडी, दापोडी, घरकुल, चिखली, दिघी, कासारवाडी, च-होली, संभाजीनगर, रुपीनगर, पिंपळे गुरव, नेहरुनगर या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

नागरिक रहात असणारा परिसर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने सील केलेला आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडता येत नाही. नागरिकांची गैरसोय होत आहे. अशा कंटेनमेंट झोनपैकी निगडी-यमुनानगर मधील सेक्टर २२ या परिसराचा विस्तार देखील मोठा आहे. त्यामुळे शहरातील इतर भागात व सेक्टर २२ मध्ये नागरिकांसाठी किराणा माल, राशन, दुध, भाजीपाला व फळे यांच्या हातगाड्या तसेच इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने परिसरात सोय करण्यात यावी, त्यामुळे त्या वस्तू खरेदी करणे त्यांना सुलभ जाईल, जेणेकरून त्यांचे हाल होणार नाहीत. आयुक्तांनी या मागणीचा विचार करून, शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, असे या पत्रकात चिखले यांनी म्हटले आहे.”

Share this to: