बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना तातडीने पुन्हा सुरू करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी, दि. २९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – महाराष्ट्र कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने अटल सन्मान योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था सुरू करण्यात आली होती. मात्र कामगार कल्याण विभागात भोंगळ कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेली ही योजनाच बंद करून टाकली आहे. कोरोनाच्या संकटकाळात ही योजना बांधकाम कामगारांसाठी फायदेशीर ठरली असती. मात्र ही योजना बंद असल्यामुळे महाराष्ट्रासह पिंपरी-चिंचवडमधील हजारो बांधकाम कामगारांची उपासमार होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन बांधकाम कामगारांची मध्यान्ह भोजन योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागणीचे पत्र मेल केले आहे.

त्यामध्ये म्हटले आहे, “कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन शासनाने केले आहे. या परिस्थितीत कोणी गवंडी काम करणारे, तर कोणी बिगारी, कोणी बांधकाम व्यावसायिकांकडे छोटी-मोठी कामे करून पोट भरणारे, तर कोणी प्रसंगी साफसफाई करून पैसे कमावणारे आणि घरापासून शेकडो किलोमीटर लांब असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम कामगारांवर ‘कोरोना’ने उपासमारीची वेळ आणली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन असल्याने शहरातील सर्व कामे बंद आहेत. बांधकाम कामगार रस्त्यावर आले आहेत. पिंपरी चिंचवडमधील रहाटणी, सांगवी, डांगे चौक नाक्यावर बांधकाम कामगारांसाठी अटल सन्मान योजनेअंतर्गत सुरू असलेली मध्यान्ह भोजन योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे खायचे काय असा प्रश्न बांधकाम कामगारांना पडला आहे.

देश आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून कामांसाठी आलेले  कामगार या परिस्थितीमुळे शहरातच अडकून पडले आहेत. शहरात काम करताना ही मंडळी ज्या साइटवर काम चालायचे, तिथेच राहायचे. पण आता कामेच बंद असल्याने जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. या सगळ्यात प्रमुख समस्या आहे, ती त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची. या सर्व कामगारांचे हातावरचे पोट आहे. सध्या आणीबाणीची परिस्थिती असताना बांधकाम कामगारांचे जेवण बंद करणे योग्य नाही. कामगार कल्याण विभागाचा सुरू असलेला भोंगळ कारभारामुळे मध्यान्ह भोजन योजना बंद झाली आहे. याची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. कामगारांची सामाजिक सुरक्षा, संरक्षण, जेवण या सुविधा देण्याकरिता कटिबध्द असलेल्या शासनाप्रती कामगारांच्या मनामध्ये  तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचा सहानभूतीपूर्वक विचार करून त्यांची होणारी उपासमार थांबवण्यासाठी मध्यान्ह भोजन योजना पूर्ववत तातडीने सुरू करावी. बांधकाम कामगारांना दोन वेळचे जेवण पुरवण्यात यावे. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संबंधित ठेकेदाराला जेवण वाटपाच्या वेळी सॅनिटायझर लावणे, ठराविक अंतर ठेऊन बांधकाम कामगारांना जेवण पुरविण्याचे आदेश देण्यात यावेत. जेणेकरून बांधकाम कामगारांना दिलासा मिळेल व आपत्कालीन परिस्थितीमध्ये बांधकाम कामगारांच्याप्रती शासनाची संवेदनशीलता दिसेल. त्यामुळे बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.”

Share this to: