विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या वतीने पिंपळेसौदागरमधील नागरिकांच्या दारापर्यंत भाजीपाला; सोशल डिस्टन्सिंगचीही जनजागृती

चिंचवड, दि. २८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – लॉकडाऊन काळात मंडईमध्ये होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पिकालाही बाजार उपलब्ध व्हावा यासाठी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपळेसौदागर परिसरातील सोसायट्यांमधील नागरिकांना थेट भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळत दोन ग्राहकांमध्ये तसेच ग्राहक व शेतकऱ्यांमध्ये विशिष्ट अंतर राखण्यात आले होते.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरू आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र दैनंदिन भाजीपाल्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडणे अनिवार्य आहे. यावर उपाय म्हणून विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपळेसौदागर भागात शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट नागरिकांच्या दारापर्यंत घरपोच पोहचविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

पिंपळे सौदागर भागातील कुंदन इस्टेट, साई प्लॅटिनियम, शिवसाई विश्व, शिव आंगण सोसायटी, प्लॅनेट मिलेनियम सोसायटी या सोसायट्यांमधील नागरिकांसाठी थेट प्रत्येक सोसायट्यांच्या पार्किंग आवारात भाजीपाल्याचा स्टॉल उभारण्यात येत आहे. खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंग राखत दोन ग्राहक तसेच ग्राहक व शेतकऱ्यांमध्येही 3 फुटांचे अंतर राखण्यात येत आहे.

यासंदर्भात बोलताना नगरसेवक नाना काटे म्हणाले की, कोरोनामुळे संपूर्ण देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम सगळ्यांवरच झाला आहे. मात्र सद्यस्थितीत लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे. मात्र तरीही नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असल्यामुळे आम्ही पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांसाठी त्यांना दररोज लागणारा भाजीपाला थेट त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. याचा फायदा शेतकरी बांधवांनाही होणार असून त्यांचेही पिकांचे नुकसान न होता त्यांनाही आर्थिक चलन सुरू राहणार आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहता लवकरच हा उपक्रम पिंपळे सौदागरमधील सर्वच सोसायट्यांमध्ये राबविला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.”

Share this to: