पिंपरी-चिंचवडमधील भुकेने व्याकुळ कष्टकरी जनतेला समाजाने मदत करावी – बाबा कांबळे

पिंपरी, दि. २८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमधील भुकेने व्याकूळ गोरगरीब कष्टकरी जनतेची जबाबदारी  समाजाने घ्यावी. अन्नावाचून कोणी गोरगरीब मरू नये यासाठी समाजातील व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले आहे.

कोरोनाच्या साथीमुळे देशभरात २१ दिवसाची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. अशा बिकट परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कष्टकरी जनतेची भूकमारीची अवस्था होऊ नये यासाठी सरकारने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यात २ रुपये किलो तांदूळ मिळणार आहे. परंतु सरकारी मदत पोहोचण्यास वेळ लागणार आहे. आपल्याकडे हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कष्ट केल्याशिवाय त्यांच्या घरात अन्न शिजत नाही. रोज कमवणे आणि रोज खाणे अशी अवस्था आहे.            

त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये “भुकेलेल्यांना अन्न एक हात मदतीचा” हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, शहरातील अनेक समाजसेवी संस्था संघटना एकत्र येऊन हा उपक्रम राबवत आहेत. बांधकाम मजूर, कागद-काच-पत्रा वेचक, विधवा, कंत्राटी कामगार, परित्यक्ता, अनाथ अपंग व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तांदूळ, डाळ, साखर, चहा पावडर आदी जीवनावश्यक वस्तू देण्याचे काम शहरात सुरू झाले आहे,

आतापर्यंत निगडी, चिंचवड, पिंपरी या परिसरातील अनेक वस्तीत जाऊन त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाची मदत घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हे कार्य सुरू करण्यात आले आहे. कष्टकरी कामगार पंचायत, रिपब्लिकन वाहतूक आघाडी, अग्रवाल समाज संघटना, वडार समाज सामाजिक संघटना यांसह अनेक सामाजिक संघटनांनी यात सहभाग घेतला आहे. या कामात पोलीस प्रशासन आणि पोलीस अधिकारी देखील मोलाची मदत करत आहेत.

पिंपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद वाघमारे, पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे ,निगडी पोलिस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, कष्टकरी कामगार पंचायतचे बाबा कांबळे, वाहतूक आघाडीचे अजित शेख, अग्रवाल समाज संघटनेचे भीमसेन अग्रवाल, वेदप्रकाश गुप्‍ता, अनिल अगरवाल सामाजिक कार्यकर्ते  आरिफ शेख, वडार सामाजिक संघटनेचे संजय बनपट्टे आदी या उपक्रमात सहभागी आहेत.

Share this to: