कोणी विचारलं तर अजित पवारचा फोन आलता म्हणून सांग; ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई, दि. २८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – राज्यात सध्य़ा करोनाने थैमान घातला असल्याने अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहेत. केंद्र सरकारकडून देशभरात लॉक़डाउन जाहीर करण्यात आलं आहे. तर त्याआधीच राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी जाहीर केली होती. दरम्यान ग्रामीण भागातील शेतीची कामं अडून येत यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पेट्रोल, डिझेल पंप सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी शेतकऱ्यांना अडचण येताना दिसत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये अजित पवार डिझेल न देणाऱ्या पेट्रोल पंप चालकाशी बोलत असून निर्णयाची अमलबजावणी करण्यास सांगत आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे ?

ऑडिओ क्लिपमध्ये सुरुवातीलाच एक व्यक्ती अजित पवारांनी सांगतोय की, दादा पार्थ निंबाळकर बोलत आहे. इथल्या पंपावर आपल्या शेतकऱ्यांना डिझेल देत नाही आहेत. यावर अजित पवार देणार, द्यायला सांगितलं आहे असं सांगतात.

यानंतर संबंधित व्यक्ती पेट्रोल पंप चालकाकडे फोन सोपवतो. त्यानंतर अजित पवार सांगतात की, “सगळ्यांना द्यायला सुरुवात करा. आत्ताच आम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. शेतकऱ्यांना लागेल तेवढं पेट्रोल डिझेल द्यायचं. एसपी, कलेक्टर सगळ्यांना सांगितलं आहे, तुम्ही द्या. कुणी काही केलं तर मला फोन करा, मी आहे मुंबईत. शेतकऱ्यांची तोडणीची वैगेरे कामं आहेत ती अडता कामा नयेत. मी सांगतोय म्हणून द्या. कुणी विचारलं का सुरु केलं तर त्यांना सांगा अजित पवारांचा फोन आला होता”.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही आज बोलताना शेतीची काम बंद होऊ नये. यासाठी आम्ही काल पेट्रोल पंप चालकांशीही संवाद साधला असल्याची माहिती दिली होती. “शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आमची चर्चा झाली. शेतीविषयक काय उपाययोजना करता येतील यावर आम्ही संवाद साधला. शेतीची काम बंद होऊ नये. आम्ही काल पेट्रोल पंप चालकांशीही संवाद साधला आहे. आम्ही शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल देण्यास सांगितलं आहे. शेतकऱ्यांची कोणतीही कामं अडता कामा नये असं सांगितलं.”

Share this to: