पिंपरी-चिंचवड शहरात देशी आणि विदेशी दारूची सर्रास विक्री; आरपीआयचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पिंपरी, दि. २८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – लॉकडाऊन असूनही पिंपरी-चिंचवडमध्ये देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्यांवर दारूबंदी कायद्यासह एमपीडीए कायद्यानुसार गुन्हा दाखल करून या लोकांवर जरब बसविण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आरपीआय शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस महासंचालक, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांना मेल केले आहे.

त्यामध्ये म्हटले आहे, “कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्री करता येईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ठिकाणी बिनधास्तपणे तसेच काही भागात चोरून लपून देशी आणि विदेशी दारूची विक्री सुरू आहे. पिंपरी कॅम्प, भाटनगर, काळेवाडी, थेरगाव, वाकड, भोसरी, चिखली, निगडी, चिंचवड, तळेगाव याठिकाणच्या अनेक भागात देशी आणि विदेशी दारूची विक्री होत असल्याचे उघड गुपित आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार गंभीरपणे पावले टाकत असताना पिंपरी-चिंचवडमधील काही समाजकंटकांना त्याचे काहीही देणेघेणे नसल्यासारखे चित्र आहे. हे समाजकंटक देशी आणि विदेशी दारूची विक्री सुरू ठेवून एकप्रकारे कोरोचा विषाणूचा संसर्ग वाढविण्याचा धोका पत्करत आहेत, हेच दिसून येते. ही समाजासाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये देशी आणि विदेशी दारूची विक्री करणाऱ्या समाजकंटकांवर दारूबंदी कायद्यासह एमपीडीए कायद्यांतर्गत तातडीने कारवाई करण्यात यावी.”

Share this to: