उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामतीत सुरक्षेसाठी तैनात दहा पोलिसांना मारहाण

बारामती, दि. २८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी सुरू असताना बारामतीत धक्कादायक प्रकार घडला आहे. बारामती तालुक्यात संचारबंदीसाठी तैनात पोलिसांना दोन ठिकाणी मारहाण केल्याचे प्रकार समोर आले आहेत. शुक्रवारी दुपारी बारामती शहरातील जळोची भागात पोलिसांना काही नागरिकांनी मारहाण केली होती. यात काही क्वॉरंटाईन नागरिकांनी मारहाण केल्याची माहिती आहे, तर काटेवाडीत देखील पोलिसांना मारण्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या मुलाने पोलीस कर्मचाऱ्याला स्टंपने मारहाण केल्याची घटना घडली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या तालुक्यात मारहाण केल्याच्या एकाच दिवशी दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काटेवाडी हे अजितदाद पवार यांचे गाव म्हणून ओळखले जाते. शहरात दिवसभरात एकूण दहा पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे बारामतीत पोलिसांची सुरक्षा आता ऐरणीवर आली आहे.

याआधीही वसईत पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते.  बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. अशा घटनांमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे.

Share this to: