पिंपरी-चिंचवडकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, कोरोनाबाधित पाच रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह; महापौर माई ढोरे यांची माहिती

पिंपरी, दि. २८ (पिंपरी-चिंचवड टाइम्स) – कोरोनाची लागण झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील आणखी पाच रुग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. पिंपरी-चिंचवडकरांसाठी ही आनंदाची बाब आहे. यापूर्वीच कोरोना बाधित तीन रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आले आहे. आता रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या पाच रुग्णांचा आणखी एक रिपोर्ट तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तोही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर या पाच रुग्णांनाही घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असून, नव्याने एकही रुग्ण शहरात आढळलेला नाही, अशी माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, “पिंपरी-चिंचवड शहरात १२ मार्च रोजी कोरोनाची लागण झालेले पहिले तीन रुग्ण आढळले होते. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासले असता ते पॉझिटिव्ह आले. त्यामुळे या तीनही रुग्णांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डात १४ दिवस उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर लागोपाठ आणखी आठ कोरोना बाधित रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण परदेशातून शहरात आले होते. त्यामुळे शहरात कोरोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १२ झाली होती. या सर्वांवर वायसीएम रुग्णालयात स्वतंत्रपणे उपचार सुरू होते.

१४ दिवसांच्या उपचारानंतर शहरातील पहिले तीन रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यांचे दोन्ही तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आता आणखी पाच रुग्णांचा पहिला तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने आज आणखी एकदा तपासणीसाठी पुण्यातील ‘एनआयव्हीकडे’ पाठविण्यात आले आहेत. हा दुसरा तपासणी रिपोर्ट देखील निगेटिव्ह आल्यानंतर हे पाचही रुग्ण ठणठणीत बरे झाल्याचे स्पष्ट होईल. त्यानंतर त्यांनाही घरी सोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेल्या १७ जणांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत. हे रुग्ण वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांत शहरात कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. पिंपरी-चिंचवडकरांसाठी ही आनंदाची बाब असल्याचे महापौर माई ढोरे यांनी सांगितले.”

Share this to: