पिंपरी-चिंचवडमधील विक्रेत्यांनी फळे आणि भाजीपाला माफक दराने विकावा; महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांचे आवाहन

पिंपरी, दि. २७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) –  कोरोना विषाणूला रोखण्यासाठी  महाराष्ट्र बंद करण्यात आला असून राज्यात आत्यावशक  सेवा  सुरु आहेत. या संकट काळात काही भाजीपाला व फळ विक्रेते हे चढ्या दराने विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब योग्य नसून या काळात  नफ्याची  अपेक्षा न ठेवता एक सामाजिक बांधिलकी म्हणून  गर्दी न करता  कमी दरात सेवा द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांनी भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले. अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशाराही त्यांनी विक्रेत्यांना दिला.

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आपल्या देशासह महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.  मुख्यमंत्री, सर्व प्रशासन, पोलिस यंत्रणा, विविध संघटना राज्यातील जनतेचे या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी पुरेशी काळजी घेत आहेत. सध्या  सर्व अस्थापने बंद करून तसेच दुकाने, शाळा, कॉलेजला सुट्टी देऊन व राज्यात जमावबंदी केली आहे. हे संकट मोठे असल्याने राज्यातील सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवणे आणि सरकारला मदत करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. यात राज्यातील असंघटीत कामगारही  सहभागी झाले आहेत.

अशा संकट काळात सर्व संघटना नागरिकांना विविध वस्तू मोफत वाटप करत आहेत. नागरिकांना  आता  अगदी अल्प दरात भाजीपाला आणी फळे देऊन सेवा करुन आपले कर्तव्य बजावावे. काही काळ भाजीपाला उपलब्ध नसल्यामुळे बाजार समितीमधूनच महाग माल मिळाल्यामुळे दर वाढले होते. मात्र आता भाजीपाला सुरळीत होणार आहे. सध्या नागरिकांना पगार नाही. व्यवसाय नाही. काम नाही. यामुळे सध्या सर्वांकडे आर्थिक चणचण भासत आहे. अशा कालावधीत सर्व विक्रेत्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक आहे. अल्प दरात नागरिकांना भाजीपाला उपलब्ध करुन द्यावा. दर असलेला फलक समोर लावावा, असे आवाहन नखाते यांनी केले.

यावेळी कार्याध्यक्ष इरफान चौधरी, संघटक अनिल बारावकर, मधुकर वाघ, रमेश ढगे आदी उपस्थित होते.

Share this to: