भुकेल्या विद्यार्थ्यांसाठी थेरगाव सोशल फाऊंडेशनचे हात सरसावले; जेवणाचे डबे पाहून विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी

चिंचवड, दि. २६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याने पिंपरी-चिंचवडमधील गोरगरीबांच्या पोटाची चिंता वाढली आहे. अनेक गरीबांच्या आणि बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या पोटाला अन्न मिळणे मुश्किल बनले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणांहून सामाजिक संस्था समोर येत आहेत. थेरगाव येथील थेरगाव सोशल फाऊंडेशनने बाहेरगावाहून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेवणाचे डबे देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. हा डबा मिळाल्यानंतर विद्यार्थी डोळ्यात पाणी आणून थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या माणुसकीचे आभार मानत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. या काळात नागरिकांना घरातून बाहेर न निघण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या काळात गरीब, मजूर तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांचा प्रश्न गंभीर झाला आहे. या लोकांच्या रोजगार आणि जेवणाची समस्या निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे बाहेरगावाहून पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची भ्रांत झाली आहे.

विद्यार्थ्यांवर उपासमारीची आलेली वेळ पाहून थेरगाव येथील थेरगाव सोशल फाऊंडेशन त्यांच्या पोटाला अन्न देण्यासाठी धावून आली आहे. थेरगाव सोशल फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे पुरवत आहेत. फाऊंडेशनच्या या माणुसकीमुळे डबा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजाने, शहरातील स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या अनिकेत प्रभु यांनी केले आहे.

Share this to: