कोरोनाची लागण झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील तिघांचे अहवाल निगेटिव्ह; डिस्चार्ज मिळण्याची शक्यता, महापौर माई ढोरे यांची माहिती

पिंपरी, दि. २६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड शहरात सुरूवातीला एकदम तीन जणांना कोरोनाची लागण झाली होती. या तीनही रुग्णांवर गेल्या १४ दिवसांपासून वासीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर या तिघांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता या तिघांच्या घशातील द्रव्याचे नमुने दुसऱ्यांदा चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दुसरा अहवालही निगेटिव्ह आला तर तीनही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली आहे.

पुण्यातील डिस्चार्ज देण्यात आलेल्या दाम्पत्याबरोबर हे तिघे दुबईला गेले होते. तपासणीत या तिघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे १० मार्च रोजी तिघांनाही वायसीएम रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर तिघांच्याही घशातील द्रव्यांचे नमुने पुण्यात एनआयव्हीला तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये तिघांचाही अहवाल निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिघांवरही वायसीएम रुग्णालयात आयसोलेशन विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, डॉक्टरांच्या १४ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री उशिरा आलेल्या तपासणी अहवाल आला आहे. तिघांचाही अहवाल निगेटिव्ह आहे. आता या तिघांचीही आणखी एक चाचणी होणार आहे. त्यासाठी त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने प्रशासनाने पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविले आहे. चाचणी अहवाल रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी येणे अपेक्षित आहे. दुसरा अहवाल सुद्धा निगेटिव्ह आला तर प्रशासनाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण करून तिघांनाही डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे महापौर ढोरे यांनी सांगितले.

Share this to: