अमेरिकेत एकाच दिवसात १० हजार नागरिकांना कोरोनाची लागण; जागतिक आरोग्य संघटनेने दिला मोठा इशारा

नवी दिल्ली, दि. २५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. करोना व्हायरसचे पुढचे केंद्र अमेरिका असू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. भारतात लॉकडाउन झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून हा सूचक इशारा देण्यात आला आहे.

अमेरिकेत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पुढच्या काही दिवसात युरोपपेक्षा अमेरिकेत जास्त रुग्ण आढळून येतील असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे. कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची जी नवीन आकडेवारी समोर आली आहे, त्यात ८५ टक्के प्रकरणे युरोप आणि अमेरिकेतील आहेत असे डब्लूएचओच्या प्रवक्त्या मारग्रेट हॅरिस यांनी पत्रकारांना सांगितले.

सोमवारी रात्री प्रसिद्ध झालेल्या डब्लूएचओच्या ताज्या आकडेवारीनुसार मागच्या २४ तासात युरोपमध्ये २० हजार १३१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेत हीच संख्या १६ हजार ३५४ आहे. युरोपच्या तुलनेत अमेरिकेत कोरोना वेगाने फैलावत असल्याबद्दल हॅरीस यांना पत्रकारांनी विचारले, त्यावेळी त्या म्हणाल्या की, अमेरिकेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अमेरिकेत एकाच दिवसात १० हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत १५० अमेरिकन नागरीकांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

Share this to: