आम्हाला शूट अॅट साईटचा आदेश द्यायला भाग पाडू नका; तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी नागरिकांना भरला दम

हैदराबाद, दि. २५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – आम्हाला संचारबंदीत शूट अॅट साईटचा आदेश द्यायला भाग पाडू नका, असा सज्जड दम तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी भरला आहे. हैदराबादमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. नागरिकांनी लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन केल्यास शूट अॅट साईटचा आदेश द्यावा लागेल. त्यामुळे अशी परस्थिती उद्भवू देऊ नका, असे चंद्रशेखर राव म्हणाले. सोमवार आणि मंगळवारी लोक ज्याप्रकारे लॉकडाऊन तोडून घराबाहेर पडले त्यावर केसीआर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने याआधीच संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात २१ दिवस म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.

लॉकडाऊनविषयी बोलताना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव म्हणाले, “अमेरिकेत लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सैन्याला पाचारण करावे लागले आहे. लोकांनी लॉकडाऊन पाळला नाही तर आम्हाला २४ तासांचा कर्फ्यू लावावा लागेल आणि शूट अॅट साईटचा आदेश द्यावा लागेल. त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की अशी परिस्थिती उद्भवू देऊ नका.”

हैदराबादमधील सर्व नगरसेवकांनी रस्त्यावर उतरुन सर्व चेक पोस्टवर पोलिसांना मदत करावी. लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व मंत्री, आमदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. मात्र सैन्याला पाचारण करणे, कर्फ्यू लावणे किंवा शूट अॅट साईटचा आदेश द्यावे लागेल, अशी परिस्थिती उद्धवू देऊ नका, असे चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.”

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३६ झाली आहे आणि १९ हजार ३१३ जण देखरेखीखाली आहेत. त्यांचे पासपोर्ट परत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ११४ जण संशियत आहेत.

Share this to: