कोरोनाची लागण झालेल्या पुण्यातील पहिल्या रुग्ण दाम्पत्याचा गुढीपाडवा गोड; आजारातून बरे झाल्याने मिळाला डिस्चार्ज

पुणे, दि. २५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त म्हणून नोंद झालेल्या पुण्यातील पहिल्या दोन  रुग्णांना आज (बुधवार) नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या दाम्पत्याचा पाडवा गोड झाला आहे. दुबईहून पुण्यात आलेल्या या दाम्पत्याला ९ मार्च रोजी नायडू रुग्णालयात आणले होते. ते करोना पॉझिटिव्ह ठरले होते. मात्र दोन वेळा त्यांची टेस्ट निगेटीव्ह आली. या दाम्पत्याला आज डिस्चार्ज देण्यात आला. नव्या वर्षाची त्यांची सुरुवात चांगली ठरली आहे.

दुबई येथून आलेले पती-पत्नी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांच्यावर १४ दिवस उपचार केल्यानंतर दोघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. त्यामुळे आज नायडू रुग्णालयातील दुसर्‍या मजल्यावरून दोघांना खाली आणण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्या दोघांना गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले आहे.

पुण्यात आढळलेले कोरोनाग्रस्त दाम्पत्य हे महाराष्ट्रातले पहिले दोन कोरोना रोगाची लागण झालेले रुग्ण होते. ते दुबईहून मुंबईत आले आणि ९ मार्च रोजी मुंबईहून पुण्यात टॅक्सीने आले होते. ते ज्या टॅक्सीने आले त्या टॅक्सी ड्रायव्हरलाही कोरोनाची लागण झाली. तसेच त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली. मात्र हे दाम्पत्य आज कोरोनातून खडखडीत बरे झाले आहे. त्यांची दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटीव्ह आली आहे त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आज नायडू रुग्णालयात या दाम्पत्याची मुलीसह आणखी दोघांची कोरोना चाचणी पुन्हा करण्यात येईल. ती चाचणी निगेटीव्ह आल्यास त्यांनाही घरी पाठवण्यात येईल, अशी माहिती महापौरांनी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देश लॉकडाउन करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून कुणीही बाहेर पडणार नाही असे थेट निर्देशच केंद्र सरकारने दिले आहेत.

Share this to: