कठीण काळात आमदार लक्ष्मण जगताप यांचे माणुसकीचे पाऊल, विद्यार्थ्यांसाठी एक वेळ जेवणाची केली सोय; माणुसकी न विसरण्याचे इतरांनाही केले आवाहन

पिंपरी, दि. २४ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – असं होतं ना कधी, की बरंच काही घडून जातं आणि घडतही असतं आणि तुम्हाला वाटतं कि, ‘त्या वेळी मी असं केलं असतं तर बरं झालं असतं, त्या वेळी मी तसं केलं असतं तर बरं झालं असतं!!’ पण खूप महत्त्वाची असते ती “एक पाऊल माणुसकीची”. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरंच काही घडत आहे. या काळात ज्याच्याकडे आहे तो निर्धास्त आहे. पण समाजात अशी बरीच लोकं आहेत, ज्यांच्यापुढे आज पोट कसे भरायचे, हा प्रश्न आहे. त्यात प्रामुख्याने बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थ्यांची रोजच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. अशांसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी माणुसकीचे एक पाऊल उचलले आहे. या विद्यार्थ्यांना दररोज एक वेळ रात्रीचे मोफत जेवण देण्यासाठी चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चंद्ररंग अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्य लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, व्यवहार ठप्प आहेत. त्याचा मोठा फटका बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना बसला आहे. शहरातील सर्व हॉटेल आणि खानावळी बंद आहेत. त्यामुळे खायचे काय असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. विद्यार्थ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. अशा विद्यार्थ्यांना एक वेळचे तरी जेवण मिळावे यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी चंद्ररंग अन्नपूर्ण योजना सुरू केली आहे.

त्याअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहणाऱ्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना दिवसातून एक वेळ रात्रीचे मोफत जेवण देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गरजू कामगारांनाही एकवेळ मोफत जेवण पुरविण्यात येत आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्या विद्यार्थ्यांना आमदार लक्ष्मण जगताप आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांचा मोठा आधार मिळाला आहे. या माणुसकीबद्दल बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांनी आमदार लक्ष्मण जगताप आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे आभार मानले आहेत.

याबाबत आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा अतिशय वाईट काळ आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना एक वेळ तरी जेवण मिळावे यासाठी चंद्ररंग अन्नपूर्ण योजना सुरू केली आहे. मी शहरात राहणाऱ्या सगळ्या लोकांना आवाहन करतो की, त्यांनी देखील विद्यार्थीच नव्हे तर हातावर पोट असणाऱ्या इतरांनाही शक्य होईल तेवढी मदत करावी. आपण सर्वजण माणूस आहोत आणि माणुसकी दाखविण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.”

विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या या अन्नपूर्ण योजनेसाठी भाजप नगरसेविका उषा मुंढे या सुद्धा राबत आहेत. जेवण बनविण्यापासून ते बनविलेले जेवण पॅक करण्यापर्यंतचे काम त्या स्वतः करत आहेत. या योजनेअंतर्गत एक वेळ मोफत जेवण पुरविले जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उषा मुंढे (9552737545), विनोद तापकीर (9822880397), सुनील देवकर (9970151578), शिवाजीराव निम्हण (981156794) आणि ललित म्हसेकर (9850362222) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Share this to: