संपूर्ण भारत देश १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली, दि. २४ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. जनता कर्फ्यूने दाखवून दिले की, देशावर ज्यावेळी कोणतेही संकट येते तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. कोरोनासारख्या महारोगाने जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवले आहे. त्या राष्ट्रांकडे साधन नाहीत, असे नाही. पण हा आजार इतक्या वेगाने पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. त्यामुळे आज मंगळवार रात्रीपासून १४ एप्रिलपर्यंत एकूण २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात येत आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.

देशात करोना आजाराचा उद्रेक झाला आहे. देशातील अनेक राज्य लॉकडाउनमध्ये गेली आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद करणार असल्याचं ट्विट करून सांगितलं होतं. त्यामुळे पंतप्रधान मोदी करोनाला आळा घालण्यासाठी कोणती मोठी घोषणा करणार यावरून चर्चा सुरू होती. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “करोनामुळे देशासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्याने होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. हा आजार आगीसारखा पसरत चालला आहे. त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे एकमेकांपासून दूर राहणे आणि घरातच राहणे. देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी आज मी आज रात्री बारा वाजेपासून २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात असल्याची घोषणा करत आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीने लागू केला जाईल, असे मोदी यांनी सांगितले.

आपण त्या टप्प्यावर आहोत…

कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी एकच पर्याय आहे. घरात राहणे. तुमची एक चूक तुमच्या घरापर्यंत कोरोनाला घेऊन येऊ शकतो. ज्यावेळी कोरोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर सुरूवातीच्या काळात प्रसाराचा वेग खूप कमी होता. पण, त्यानंतर हे प्रचंड वाढले आहे. मी देशवासियांना आवाहन करतो. त्यांनी घरातच राहून या संकटाला परतवून लावण्यासाठी मदत करावी. ही वेळ धैर्याने सामोर जाण्याची आहे. भारत अशा टप्प्यावर आहे. ज्यामुळे भारताला अनेक आर्थिक संकटांचा मुकाबला करावा लागणार आहे. पण, एक लक्षात ठेवा जान है तो जहाँन है,’ असे म्हणत मोदी यांनी देशवासियांना धीर दिला.

Share this to: