पिंपरी-चिंचवड, पुणेसह जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर बंदी; जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांचे आदेश

पिंपरी, दि. २४ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आटोकाट प्रयत्न सुरू असताना रस्त्यावरील रहदारी सुरूच असल्याचे चित्र आहे. अनेकजण रस्त्यावर गाड्या घेऊन फिरत आहेत. तसेच पेट्रोल पंपवर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने पिंपरी-चिंचवड, पुणे शहरांसह संपूर्ण जिल्ह्यात सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी (दि. २४) आदेश जारी केले आहेत.

पुणे जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढली. पुण्यानंतर राज्यातील इतर भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्य सरकारने साथरोग प्रतिबंधक कायदा राज्यात लागू केला. त्याचबरोबर गर्दी रोखण्यासाठी संचारबंदीही लागू करण्यात आलेली आहे. मात्र, तरीही नागरिक बाहेर पडत आहेत.

कोरोनाचा संसर्ग थांबवण्याच्या दृष्टीने पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे शहरांसह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल पंपावर होत असलेल्या गर्दीमुळे करोनाचा संसर्ग पसरण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश मंगळवारी सायंकाळी जारी करण्यात आले आहेत.

या बंदीतून यांना वगळले पण…

अत्यावश्यक सेवेवर कार्यरत असणारे सर्व अधिकारी व कर्मचारी.

करोना नियंत्रण व निर्मुलनासाठी कार्य करणाऱ्या खाजगी व्यक्ती.

अत्यावश्यक वस्तू व सेवा संदर्भात कार्य करणारी खाजगी व्यक्ती.

वैद्यकीय उपचार किंवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती.

विशेष म्हणजे या चारही प्रकारच्या व्यक्तींनी पेट्रोल भरताना एकदाच गाडीची टाकी भरून घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Share this to: