औरंगाबादमधील त्या प्राध्यापक महिलेची कोरोनावर मात; २३ मार्चला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरचे मानले आभार

औरंगाबाद, दि. २३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – औरंगाबादेतील एका ५९ वर्षीय महिला प्राध्यापिकेला कोरोनाची लागण झाली होती. तिच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार करण्यात आले. १५ मार्च रोजी तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मात्र आता ही महिला कोरोनातून मुक्त झाली असून तिला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज दिल्यानंतर महिलेने डॉक्टरांचे आभार मानले. तसेच रुग्णालयातील मंदिरात दर्शन घेतले.

परदेशातून आली होती महिला

संबंधित ५९ वर्षीय महिला रशिया आणि कझाकिस्तानमध्ये गेली होती. भारतात परतल्यानंतर तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. यानंतर तिच्यावर शहरातील एका खासगी रुग्णलयात उपचार सुरू होते. दरम्यान २१ मार्च रोजी महिलेचे नव्याने पाठवलेल्या स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले आणि आज २३ मार्च रोजी तिला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे.

तिच्या संपर्कातील सर्व २१ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह

औरंगाबादच्या पहिल्या कोरोना रुग्ण म्हणून या महिला प्राध्यापिकेवर येथील मिनी घाटीत उपचार केले जात होते. दरम्यान तिच्या संपर्कात आल्याच्या संशयातून संबंधित महाविद्यालयातील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या ४२६ विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. तसेच महाविद्यालयातील कर्मचारी आणि प्राध्यापकांना सुद्धा अशाच सूचना देण्यात आल्या. या घटनेने महाविद्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यातील २१ संशयित असलेल्या विद्यार्थ्यांचे स्वॅब (घशाचे द्रव) सॅम्पल चाचणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. २१ मार्च रोजी विद्यार्थी आणि नव्याने पाठवलेल्या महिलेच्या स्वॅबचे निकाल समोर आले. यापैकी कुणालाही कोरोनाचा संसर्ग नसल्याचे समोर आले. यामुळे आता औरंगाबादमध्ये एकही कोरोनाग्रस्त नाही.

Share this to: