मी घरात राहू शकत नाही, मी समाजाचा शत्रू आहे; घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी शिकवला धडा

मंदसौर, दि. २३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – लॉकडाऊननंतरही लोकांना आपल्या घरातून बाहेर पडल्याशिवाय रहावत नाहीए. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीची साखळी तोडण्याची बाब ते गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. प्रशासनाने वारंवार आवाहन करुनही लोक घरातून बाहेर पडतच आहेत. अशा लोकांना मध्य प्रदेशातील मंदसौर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

करोनामुळे मंदसौर जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन आहे. तरीही काही तरुण मुलं घरातून बाहेर पडले होते. या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पंतप्रधानांनीही राज्यांना निर्देश दिले आहेत की, जे लॉकडाऊनच्या आदेशाचं उल्लंघन करेल त्याच्यावर कडक कारवाई करा. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.

हातात पॅम्लेट देऊन काढले फोटो

अशा प्रकारे नियम तोडणाऱ्या या तरुणांच्या हातात पोलिसांनी पॅम्प्लेट दिले. या पॅम्प्लेटवर ‘मी समाजाचा शत्रू आहे, मी घरी राहणार नाही’ असा मजकूर लिहिला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या हातात हे पॅम्प्लेट देऊन पोलिसांनी त्यांचे फोटो काढले आणि माध्यमांकडे सोपवले. मात्र, माध्यमांनी त्यांचे चेहरे दाखवलेले नाहीत.

मंदसौरचे पोलीस अधीक्षक हितेश चौधरी म्हणाले, “हे लोक जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कलम १४४चं उल्लंघन करीत होते. लोकांना घरात राहण्यासाठी हा सामाजिक प्रयोग करण्यात आला आहे. कारण, त्यामुळे स्वतःहूनच लोक कोणताही दबाव न आणता घरातून बाहेर पडणार नाहीत. मात्र, जर लोक अशाच प्रकारे घराबाहेर पडत राहिले तर अडचणी आणखीनच वाढतील.”

मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये सहा करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर काही संशयितांना आयसोलेट करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर परदेशातून आलेल्या लोकांनाही वेगळ ठेवण्यात आलं आहे. करोनाचा सार्वत्रिक फैलाव होऊ नये यासाठी ३० पेक्षा जास्त जिल्ह्यांना लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

Share this to: