मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत रस्त्यावर उतरून घंटानाद करणाऱ्यांवर अजितदादा संतापले

पुणे, दि. २२ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज देशरात जनतेने थाळ्या, घंटा, शंख वाजवत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. करोनाविरोधात लढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले होते. पण अनेक ठिकाणी लोक गर्दी करत रस्त्यावर उतरलेले चित्र पहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधी व जनतेने रस्त्यावर उतरून, एकत्र येऊन घंटानाद करणे अपेक्षित नाही असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

करोनाविरोधात लढणाऱ्या राज्यातील आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि सर्वांचेच मनापासून आभार! जनतेने आपल्या घरातून घंटानाद, थाळीनाद केले त्याबद्दल त्यांचेही आभार. परंतु लोकप्रतिनिधी व जनतेने रस्त्यावर उतरून, एकत्र येऊन हा घंटानाद करणे अपेक्षित नाही अशा शब्दात अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

लोकप्रतिनिधींनी आणि प्रसारमाध्यमांनी या गर्दीला प्रोत्साहन, प्रसिद्धी देणे टाळण्याची गरज आहे असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. करोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोहोचवत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, रस्त्यावर उतरून गर्दी करणे टाळावे असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

Share this to: