मुख्यमंत्र्यांनी फक्त भावनिक भाषण करून काहीही होणार नाही, नागरिकांना मदतनिधी जाहीर का करत नाही – नितेश राणे

मुंबई, दि. २२ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – करोनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र सरकार इतर राज्य सरकारांप्रमाणे नागरिकांना मदतनिधी जाहीर का करत नाही, अशी विचारणा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे. प्रत्येक स्तरावर नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असताना सरकारकडून त्यांना आर्थिक मदत दिली गेली पाहिजे असे मत नितेश राणे यांनी नोंदवले आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत आपले मत सांगितले आहे.

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकार मदतनिधी जाहीर का नाही करत ? प्रत्येक स्तरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असून त्यांना राज्य सरकारकडून मदत दिली पाहिजे. भावनिक भाषण करत असताना लोकांना मदतीचीही गरज आहे. शटडाऊन करत असताना मदतनिधीही गरजेचा आहे”

दरम्यान, उत्तर प्रदेश आणि पंजाब सरकारने तेथील नागरिकांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपन्यांना तळहातावर पोट असणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांना किमान वेतन चालू ठेवा अशी विनंती केली आहे. अमेरिकेतल्या ट्रम्प यांच्यापासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे. पण माणुसकी बाळगा. तळहातावर पोट असेल त्यांना मला सांगायचं आहे की, या संकटाने कोणालाही सोडलेलं नाही. आपणच आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहात. त्यांना जपणं सगळ्यांचं काम आहे. किमान वेतन चालू ठेवावे अशी विनंती आहे,” असं उद्दव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान याआधी नितेश राणे यांनी ट्विट करत मुंबईतील चाकरमान्यांनी कोकणात येऊ नका असे आवाहन केले होते. “एक नम्र विनंती….सलग सुट्टी असल्यामुळे खूप चाकरमानी आपल्या गावाकडे म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे निघाले आहेत. या लोकांनी गावी न येता आपल्या मुंबईच्या घरी राहावे. कारण गावी आल्यामुळे इथे व्हायरस पसरण्याची शक्यता आहे!. ही वेळ सुट्टीची नाही आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्याची आहे!,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

Share this to: