कोरोनाच्या संकटकाळात हातावर पोट असणाऱ्यांना किमान वेतन किंवा आर्थिक सहाय्य द्या; कष्टकरी संघर्ष महासंघाची मुख्यमंत्री न कामगार मंत्र्यांकडे मागणी

पिंपरी, दि. २२ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – कोरोनाच्या संकटामुळे मजूर, घरेलू कामगार, नाका कामगार, स्वच्छता कामगार, फेरीवाला, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, शेतमजूर, विडी कामगार, कंत्राटी कामगार, गटई कामगार यांच्यासह हातावर पोट असणाऱ्यांच्या हातचा रोजगार गेला आहे. या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. जगायच कसे?, असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे. हातावर पोट असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व असंघटित कामगारांना किमान वेतन व आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशी मागाणी कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्रने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आपल्या देशासह महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आपण मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनतेचे या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी पुरेशी काळजी घेत आहात. सर्व आस्थापने, दुकाने, शाळा, कॉलेजला सुट्टी देऊन व राज्यात जमावबंदी केली आहे. हे संकट मोठे असल्याने राज्यातील सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवणे आणि सरकारला मदत करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. यात राज्यातील असंघटीत कामगारही सहभागी होत आहेत.

राज्यात मजूर, घरेलु कामगार, नाका कामगार, स्वच्छता कामगार, फेरीवाला, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, शेतमजूर, विडी कामगार, कंत्राटी कामगार, गटई कामगारांसह विविध घटकांचा असंघटीत कामगारात समावेश होतो. अशा कामगारांची संख्या मोठी आहे. हे सर्वजण सरकारकडून सामाजिक सुरक्षा मिळावी म्हणून अपेक्षा करत आहेत. सध्या कोरोना संसर्ग राज्याच्या सर्व महानगरांमधील खाजगी  आस्थापने, कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेउन कंत्राटी आणी तात्पुरत्या कामगारांचे वेतन कापू नका आणि महात्वाचे म्हणजे कामावरून काढून टाकू नका असे अवाहान आपण केले आहे. त्यानुसार राज्याचे कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यानी संबधित विभागांना तशा सूचना आदेशाद्वारे दिल्या आहेत.

मात्र कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील सर्व असंघटित कामगारांचे हाताचे काम गेले आहे. हातावर पोट असणाऱ्या या कामगारवर ३१ मार्चपर्यंत मोठे संकट ओढावले आहे. या असंघटित कामगारांची व त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होऊ नये व त्यांच्या घरातील चूल पेटती राहावी यासाठी या सर्वांना किमान वेतन किंवा अर्थसहाय्य देण्यात यावे, अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष  काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, वंदना थोरात, सचिन नागने, इरफान चौधरी, वृषाली पाटणे, माधुरी जलमूलवार, नंदकिशोर श्रीवास यांनी केली आहे.”

Share this to: