पिंपरी-चिंचवड शहर लॉकडाऊन; एमआयडीसीतील सर्व कंपन्यांही रविवारपासून बंद पाळणार

पिंपरी, दि. २१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या विविध उपाययोजनांना पिंपरी-चिंचवडमधील उद्योगांनी साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण एमआयडीसी शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण मिर्णय उद्योजकांच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आजमितीला शहरातील १२ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. या आजाराचा संसर्ग आणखी वाढू नये म्हणून राज्य सरकारने पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवडसह मोठ्या शहरांत जीवनावश्यक सुविधा वगळून सर्व उद्योग धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन केले होते.

या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) एमआयडीसीच्या पुणे कार्यालयात उद्योजकांची बैठक झाली. उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, संजीवकुमार देशमुख, पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक विजय खळदकर, बशीर तरासगार, शासकिय अधिकारी, औद्योगिक संघटनेचे प्रतिनिधी, मोठ्या कंपन्यांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीमध्ये आज (शनिवारी) संध्याकाळी पाच वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत सर्व औद्योगिक कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारपासून (दि. २२) संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर लॉकडाऊन होणार आहे.

Share this to: